टूरिस्टच्या जागी आता व्हिजिटर व्हिसा; भारताची व्हिसा प्रक्रिया अधिक सुलभ 
राष्ट्रीय

टूरिस्टच्या जागी आता व्हिजिटर व्हिसा; भारताची व्हिसा प्रक्रिया अधिक सुलभ

परदेशी नागरिकांसाठी भारताची व्हिसा प्रक्रिया अधिक सुलभ करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने व्हिसा व्यवस्थेत महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत.

Swapnil S

नवी दिल्ली : परदेशी नागरिकांसाठी भारताची व्हिसा प्रक्रिया अधिक सुलभ करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने व्हिसा व्यवस्थेत महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. व्हिसाच्या मुख्य श्रेणींची संख्या १३ वरून ९, तर उपश्रेणींची संख्या ४९ वरून २३ करण्यात आली आहे. टूरिस्ट व्हिसाचे नाव बदलून व्हिजिटर व्हिसा करण्यात आले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने (एमएचए) बुधवारी यासंदर्भातील माहिती दिली.

नव्या व्यवस्थेची अंमलबजावणी करण्यासाठी मंत्रालयाकडून माहिती-तंत्रज्ञान प्रणाली अद्ययावत करण्यात येत असून, या सुधारणांनुसार चालू वर्षाच्या अखेरपर्यंत व्हिसा देण्यास सुरुवात होण्याची अपेक्षा आहे.

पूर्वीच्या टुरिस्ट व्हिसाचे नामकरण आता व्हिजिटर व्हिसा असे करण्यात आले आहे. पर्यटनाबरोबरच व्यावसायिक बैठका, वैद्यकीय सल्लामसलत, आरोग्यविषयक उपचार, अल्पकालीन अभ्यासक्रम आणि पर्वतारोहण यांसारख्या बाबींचाही त्यात समावेश करण्यात आला आहे.

व्हिजिटर व्हिसाचे व्ही-१ आणि व्ही-२ असे दोन प्रकार असतील. व्ही-१ व्हिसा पर्यटन, व्यावसायिक बैठका, वैद्यकीय सल्लामसलत, आरोग्यविषयक उपचार, वेलनेस रिट्रीट तसेच भारतीय भाषा, संगीत, कला आणि हस्तकलेच्या अल्पकालीन अभ्यासक्रमांसाठी दिला जाईल. हा व्हिसा ३० दिवसांच्या कालावधीसाठी आणि अनेकदा प्रवेश करण्याच्या सुविधेसह असेल. व्ही-२ व्हिसा दीर्घकालीन भारतभेटीसाठी असेल. अर्जदाराच्या पात्रतेनुसार तो एक, पाच किंवा दहा वर्षांच्या मुदतीसाठी दिला जाईल.

नव्या व्यवस्थेमुळे व्हिसा अर्जातील आवश्यक माहिती भरण्याची गरज ६५ ते ७० टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. सर्व २३ श्रेणी आणि उपश्रेणींमधील अर्जांचे स्वरूप अधिक सुटसुटीत करण्यात आले आहे. त्यामुळे अर्जदारांचा वेळ वाचणार असून, व्हिसा अर्जाची प्रक्रिया अधिक सोपी होणार आहे.

गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, परदेशी नागरिकांच्या भारतभेटीच्या विविध उद्देशांचा विचार करून व्हिसा व्यवस्था अधिक सुसंगत आणि परिणामकारक करण्यात आली आहे.

मेडिकल व्हिसाची सोय

वैद्यकीय उपचारांसाठी भारतात येणाऱ्या परदेशी नागरिकांना मेडिकल व्हिसा, तर संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांसह राजनैतिक दर्जा नसलेल्या अधिकृत प्रतिनिधींना ऑफिशियल व्हिसा दिला जाईल. शालेय व उच्च शिक्षण, संशोधन, इंटर्नशिप, विद्यार्थी देवाणघेवाण कार्यक्रम, योग, भारतीय संगीत, नृत्य, वैदिक संस्कृती आणि बौद्ध अध्ययनासाठी स्टुडंट व्हिसा उपलब्ध असेल.

नऊ मुख्य व्हिसा श्रेणी

नव्या व्यवस्थेत बिझनेस व्हिसा, डिप्लोमॅटिक व्हिसा, वर्क व्हिसा, जर्नलिस्ट व्हिसा, मेडिकल व्हिसा, ऑफिशियल व्हिसा, स्टुडंट व्हिसा, व्हिजिटर व्हिसा आणि मिसलेनियस व्हिसा अशा नऊ मुख्य श्रेणी असतील. बिझनेस व्हिसामध्ये दीर्घकालीन गुंतवणूक, व्यावसायिक उपक्रम, परिषदा, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम, चित्रपटांचे चित्रीकरण आदींचा समावेश आहे. डिप्लोमॅटिक व्हिसा राजनैतिक अधिकारी, संयुक्त राष्ट्रांचे राजनैतिक प्रतिनिधी आणि त्यांच्या अवलंबितांसाठी असेल. भारतीय कंपन्या, स्वयंसेवी संस्था आणि अन्य संघटनांमध्ये नोकरी करणाऱ्या परदेशी नागरिकांना वर्क व्हिसा दिला जाईल. मान्यताप्राप्त पत्रकारांसाठी जर्नलिस्ट व्हिसाची तरतूद कायम ठेवण्यात आली आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

महागाईचा भडका! महागाई दर ऑक्टोबरमध्ये ८.९४ टक्क्यांवर; RBI च्या अंदाजापल्याड अन्नधान्याच्या दरांची झेप, पुढील महिन्यात व्याजदरातही वाढीचा अंदाज

Mumbai : ‘जलसा’ बॉम्बने उडविण्याची धमकी ठरली अफवा; महापालिका कार्यालयासह, पीएनबीच्या शाखाही लक्ष्य

सीसीटीव्हीतून चीनची ‘हेरगिरी’; सुरक्षा कॅमेऱ्यांमधूनच देशाच्या सुरक्षेला धोका, गुप्तचर यंत्रणांकडून सतर्कतेचा इशारा

विलीनीकरणाबाबत संभ्रम कायम; दोन्ही राष्ट्रवादींचा एकत्रीकरणाचा कोणताही प्रस्ताव नाही - सुप्रिया सुळे

Mumbai : आंदोलकावरील गुन्हा रद्द; हायकोर्टाचा निर्णय, फौजदारी कारवाईचा वापर दुर्दैवी!