नवी दिल्ली : देशात यंदा मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा १५ टक्के कमी झाला आहे. गेल्या १७ वर्षांतील याची सर्वात कमी म्हणजेच कोरडा मान्सून म्हणून नोंद झाली आहे. यापूर्वी २००९ मध्ये पावसात १८.३ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली होती.
अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाची कमतरता पूर्ण देशाला जाणवत आहे. १ जून ते २१ सप्टेंबर या कालावधीत झालेला ८२७.२ मिमी पाऊस सामान्य मानला जातो. पण आतापर्यंत केवळ ७०३.७ मिमी पाऊस झाला आहे. म्हणजेच १२३.५ मिमीची कमतरता आहे.
३० सप्टेंबरपर्यंत संपूर्ण हंगामासाठी सामान्य पाऊस ८६८.६ मिमी असतो. हंगाम संपायला अद्याप ९ दिवस बाकी आहेत. मात्र, आता १५ टक्क्यांची कमतरता भरून निघण्याची शक्यता नाही. कारण, देशाच्या वायव्य भागातून मान्सून वेगाने परतत आहे. १९ सप्टेंबर रोजी पश्चिम राजस्थानातून मान्सूनच्या परतीला सुरुवात झाली होती. सोमवारी पंजाब, हरयाणाचा निम्मा भाग आणि राजस्थानच्या आणखी काही भागांतून मान्सून परतला. पुढील २४ ते ४८ तासांत हरयाणाचा उर्वरित भाग, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेशासह जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधूनही मान्सून परतण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरात एक प्रणाली विकसित झाली असून ती खोल दाबाच्या क्षेत्रात (डीप डिप्रेशन) रूपांतरित होत आहे.
जलाशयांत गेल्या वर्षीपेक्षा २१ टक्क्यांनी कमी पाणी
ऑगस्टपर्यंत खरीप पेरणी १.७ टक्के कमी होती. आयसीआरएच्या मते, लागवड क्षेत्र २ टक्क्यांनी घटू शकते. कमी पाऊस, अधिक तापमान आणि एल-निनोमुळे जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. त्यामुळे उत्पादन घटेल. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, तांदळाचे उत्पादन १ कोटी टनांनी घटून १४.४ कोटी टनांवर येऊ शकते. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत ६.५ टक्के कमी उत्पादन होणार आहे.
विजेची मागणी वाढणार
रब्बीची पेरणी ऑक्टोबरपासून सुरू होईल. सुरुवातीच्या सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता कमी आहे. उत्तर आणि दक्षिण भारतातील जलसाठ्यातील घट ही रब्बी हंगामासाठी जोखीम असल्याचे आयसीआरएने म्हटले आहे. गहू, हरभरा यांसारख्या पिकांवर दबाव वाढेल. १७८ प्रमुख जलाशयांमध्ये १३१.१७ अब्ज घनमीटर पाणी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण २१ टक्के कमी आहे. यामुळे वीज क्षेत्रावर दोन परिणाम होतील. पहिला, वीजपुरवठ्यात जलविद्युतचा वाटा कमी होण्याचा धोका आहे. दुसरा, विजेची मागणी वाढेल.