ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या दिवशी अमृतसरमधील गावातील शेतात क्षेपणास्त्रसदृष्य वस्तू सापडली. (प्रातिनिधिक छायाचित्र) X/Amandeep Dixit
राष्ट्रीय

१५ शहरांवर क्षेपणास्त्र हल्ल्याचा प्रयत्न फसला, भारताने निष्क्रिय केले पाकिस्तानी मिसाईल्स; एअर डिफेन्स सिस्टिमही केली उद्ध्वस्त

India Pakistan War Situation : पाकिस्तानच्या हवाई संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्त करण्यासाठी भारताने HARPY ड्रोन्सचा वापर केला, तर पाकिस्तानकडून भारतीय शहरांवर डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांना पाडण्यासाठी भारताने रशियन बनावटीच्या S-400 संरक्षण प्रणालीचा वापर केला.

Krantee V. Kale

पाकिस्तानने काल मध्यरात्री आणि आज सकाळी भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. जम्मू आणि काश्मीर, पंजाब आणि गुजरातसह देशाच्या उत्तर आणि पश्चिम भागांतील १५ शहरांमधील लष्करी ठिकाणांना लक्ष्य केले गेले होते. मात्र हे सर्व प्रयत्न निष्फळ ठरवण्यात आले आहेत, असे सरकारने गुरुवारी सांगितले.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, सरकारने सांगितले की, भारतीय सुरक्षादलांनी श्रीनगर, पठाणकोट, अमृतसर, लुधियाना, चंदीगड आणि इतर ठिकाणी असलेल्या लष्करी तळांवर हल्ला करण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांना प्रत्युत्तर म्हणून लाहोरसह अनेक ठिकाणी पाकिस्तानी हवाई संरक्षण रडार आणि प्रणालींना लक्ष्य करून निष्क्रिय केले. भारतीय सुरक्षादलांची कारवाई ही "त्याच क्षेत्रात (आणि) त्याच तीव्रतेने" पाकिस्तानच्या हल्ल्यांच्या तोडीसतोड होती, असे सरकारने आज दुपारी ठामपणे स्पष्ट केले. पाकिस्तानी दलांनी ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर केला होता, परंतु भारताच्या हवाई संरक्षण प्रणालींनी ते निष्क्रिय केले, असेही स्पष्ट करण्यात आले.

HARPY ड्रोन्स आणि S-400 संरक्षण प्रणालीचा वापर

ANI वृत्तसंस्थेच्या सूत्रांनुसार, पाकिस्तानच्या हवाई संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्त करण्यासाठी भारताने HARPY ड्रोन्सचा वापर केला, तर पाकिस्तानकडून भारतीय शहरांवर डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांना पाडण्यासाठी भारताने रशियन बनावटीच्या S-400 संरक्षण प्रणालीचा वापर केला. नष्ट करण्यात आलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचे अवशेष गोळा केले जात आहेत. त्यामुळे पाकिस्तान आर्थिक निधी किंवा लष्करी प्रशिक्षण देऊन सीमापार दहशतवादाला पाठिंबा देतो,या भारताच्या आरोपांना अधिक बळकटी मिळेल असे सरकारकडून सांगण्यात आले.

सीमावर्ती भागातील स्थिती अत्यंत तणावपूर्ण

दरम्यान, भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर 'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर पाकिस्तान चांगलाच चवताळला आहे. पाकिस्तानी लष्कराकडून 'एलओसी'वरील रहिवासी भागांना आणि नागरिकांना लक्ष्य केले जात आहे. पुंछ व राजौरी तसेच उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला व कुपवाडा या भागांमध्ये पाकिस्तानकडून सर्वाधिक हल्ले होत असून सीमावर्ती रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. शेकडो रहिवाशांना जमिनीखालील बंकरमध्ये किंवा सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.  यामध्ये किमान १३ नागरिकांचा मृत्यू झाला असून, त्यात चार लहान मुले आणि एका सैनिकाचाही समावेश आहे. तब्बल ५७ जण जखमी झाले आहेत. भारतीय सैन्यही पाकिस्तानच्या या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देत आहे. भारत-पाक संघर्षामुळे सीमावर्ती भागातील स्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली आहे.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत