नवी दिल्ली : इस्त्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर जागतिक ऊर्जा बाजारात खळबळ उडाली आहे. जगाला तेल पुरवठा करणाऱ्या पश्चिम आशियातून तेल पुरवठा विस्कळीत झाल्यास तेलाच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. शनिवारी प्रति पिंप तेलाचा दर ७८ डॉलर्सवर पोहचला. या किंमतीचा परिणाम भारतातील तेलाच्या किंमतीवर होण्याची शक्यता आहे.
तेलाचे दर वाढल्यास वाहतुकीच्या दरात वाढ होते. त्याचा मोठा परिणाम जागतिक व्यापार होतो. इस्त्रायल-इराण संघर्षामुळे नजीकच्या काळात तेल व नैसर्गिक वायूच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. भारत हा थेट इराणकडून तेल आयात करत नाही. पण, भारताला ८० टक्के तेल आयात करावे लागते.
भारतासाठी चिंतेची बाब म्हणजे उत्तरेला इराण आणि दक्षिणेला अरबी द्वीपकल्प यांच्यामध्ये होर्मुझची सामुद्रधुनी आहे. जागतिक स्तरावरील २० टक्के एलएनजीचा व कच्च्या तेलाचा
व्यापार त्या भागातून होत असतो. या होर्मुझ सामुद्रधुनीतून तेल पुरवठा विस्कळीत झाल्यास भारताची मोठी अडचण होऊ शकेल. कारण इराक, सौदी अरेबिया व संयुक्त अरब अमिरातीतून भारताला तेल पुरवठा करणारी जहाजे जात असतात.
तसेच तांबड्या समुद्रात जाणाऱ्या माल वाहतूकीचे दर स्थिर आहेत. पण, या भागातील संघर्षामुळे त्यात बदल होऊ शकतात. प. आशियातील संघर्ष वाढल्यास त्याचा परिणाम तेल व नैसर्गिक वायूच्या बाजारपेठेवर होऊ शकतो, असे विश्लेषकांनी सांगितले.