मुंबई/नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या शेजारील राष्ट्रांमधील संबंध विकोपाला गेल्यानंतर आता आशिया चषकातील साखळी सामन्यात भारत-पाक हे पारंपरिक प्रतिस्पर्धी रविवारी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. याच लढतीवरून देशात राजकीय घमासान रंगले असून विरोधकांनी तसेच हल्ल्यात मृत झालेल्यांच्या नातेवाईकांनी या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, माजी क्रिकेटपटूंसहित अभिनेते, माजी लष्करी अधिकारी तसेच अनेक सेलिब्रेटींनीही या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली असून समाज माध्यमांवर सध्या 'बॉयकॉट इंडिया-पाक मॅच' हा ट्रेंड सध्या जोरात आहे. सामन्याच्या एक दिवसआधी देशभरात अनेक ठिकाणी याविरोधात निदर्शने केली जात आहेत.
दहशतवादी हल्ल्यात देशातील माता-भगिनींचे सिंदूर मिटले. हल्ल्यातील रक्त अजून सुकलेले नाही, मग भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना कशाला हवा? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना विचारला. पाकच्या दहशतवादी कारवाया अजून सुरूच असून ऑपरेशन सिंदूर का थांबवले ? जर रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नसेल तर क्रिकेट आणि रक्त एकत्र का? त्यामुळेच भाजपने देशभक्तीच्या नावाखाली व्यापार केला. त्यामुळे निषेध म्हणून शिवसेनेच्या महिला रणरागिणी राज्यभरात आंदोलन करणार असून 'हर घर सिंदूर' जमा करून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात पोस्टाने पाठवणार आहेत, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना फैलावर घेतले.
मे महिन्यात सीमेवर तणाव निर्माण झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात पहिलाच सामना दुबई येथे होत आहे. पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये घुसून २६ पर्यटकांची हत्या केली. आता त्याच कट्टर प्रतिस्पर्ध्यामध्ये क्रिकेटच्या रणांगणात द्वंद्व होणार असल्यामुळे राजकीय टीका जोरात सुरू आहे. 'रक्त आणि क्रिकेट एकत्र वाहू शकतात का?,' असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे युवानेते तसेच आमदार आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. या सामन्याला परवानगी देणे म्हणजे पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील बळींच्या नातेवाईकांचा आणि कर्तव्य बजावताना हुतात्मा झालेल्या जवानांचा अपमान असल्याची टीका महाराष्ट्र काँग्रेसने केली आहे. तसेच ही सरकारची दुहेरी नीती आता जनतेसमोर आली आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मोदी-शहांवर टीका केली. 'आप'चे मुख्य नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही हा देशाशी विश्वासघात असल्याचे म्हटले आहे.
... म्हणून भारत या सामन्यात खेळणार - अनुराग ठाकूर
क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) किंवा आशियाई क्रिकेट परिषद (एसीसी) भरवत असते. अशा स्पर्धांमध्ये प्रत्येक देशाला भाग घ्यावा लागतो. भाग न घेतल्यास त्या देशाच्या संघाला बाहेर व्हावे लागते आणि प्रतिस्पर्धी संघाला त्याचे नाहक गुण मिळतात. त्यामुळे या स्पर्धेत जरी भारत-पाकिस्तान सामना होणार असला तरीदेखील द्विपक्षीय मालिकेत भारतीय संघ पाकिस्तानसोबत खेळणार नाही, अशी भूमिका भारताने घेतली आहे. जोवर पाकिस्तानकडून भारतावर होणारे हल्ले थांबणार नाहीत तोवर पाकिस्तानशी द्विपक्षीय मालिका होणार नाही, असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी स्पष्ट केले.
हुतात्म्यांची काहीच किंमत नाही - ऐशान्या द्विवेदी
पहलगाम हल्ल्यात माझ्या डोळ्यासमोर माझ्या पतीला गोळ्या घालण्यात आल्या. 'ऑपरेशन सिंदूर 'मध्ये अनेक सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले. तरीही, सामना आयोजित केला जात आहे. मला वाटते, बीसीसीआयमध्ये भावना नाहीत. या सर्व हुतात्म्यांची तुमच्यासाठी काहीच किंमत नाही. बीसीसीआयने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना खेळण्यास मान्यता द्यायला नको होती. देशातील क्रिकेटपटूही पाकिस्तानबरोबर खेळायला का तयार झाले आहेत?, असा सवाल पहलगाम दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या शुभम द्विवेदी यांच्या पत्नी ऐशान्या द्विवेदी यांनी उपस्थित केला.
ही देशभक्तीची थट्टा- उद्धव ठाकरे
"पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देत असताना भारतीय सैनिक सीमेवर आपल्या प्राणांची आहुती देत आहेत. अशा परिस्थितीत क्रिकेट सामने खेळणे म्हणजे देशभक्तीची थट्टा आहे. मोदी सरकारने देशभक्तीचा व्यापार केला आहे. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राला देशद्रोही ठरवले गेले होते. रविवारी होणाऱ्या सामन्याला जय शहा गेले तर त्यांना देशद्रोही ठरवणार का?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.