नवी दिल्ली : पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी अमेरिकेतून भारतावर अणुहल्ला करण्याची धमकी दिली होती. या धमकीला प्रत्युत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, अणुहल्ल्याच्या धमक्या देणे ही पाकिस्तानची जुनीच खोड आहे. पण आम्ही अशा धमक्यांना बळी पडणार नाही, हे आधीच स्पष्ट केले आहे.
या परराष्ट्र खात्याने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाकिस्तानच्या अशा बेजबाबदार विधानांवर आंतरराष्ट्रीय समुदाय निष्कर्ष काढू शकतो. पाकिस्तान केवळ प्रादेशिक सुरक्षेसाठीच नाही तर जागतिक सुरक्षेसाठीही धोका आहे. जेथे लष्कराचे दहशतवादी संघटनांशी संगनमत आहे, तेथे हा धोका अणु कमांड आणि नियंत्रणाच्या अखंडतेबद्दलच्या शंकांना देखील बळकटी देतो.
अमेरिकेलाही फटकारले
यावेळी भारताने अमेरिकेचे नाव न घेता त्यांनाही फटकारले. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, अशा प्रकारच्या धमक्या एका मित्र देशातून करण्यात आल्या आहेत, हे खेदजनक आहे. आम्ही अणु ब्लॅकमेलला बळी पडणार नाही. आम्ही आमच्या राष्ट्रीय सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलत राहू.