राष्ट्रीय

पेट्रोल पंपांमध्ये भारत जगात तिसरा! संख्या १ लाखांवर, १० वर्षांत दुप्पट वाढ; टॉप २ देश कोणते?

देशातील पेट्रोल पंपांची संख्या २०१५ पासून दुप्पट झाली आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस देशात १,००,२६६ पेट्रोल पंप आहेत.

Krantee V. Kale

नवी दिल्ली : देशातील पेट्रोल पंपांची संख्या १,००,००० वर गेली असून २०१५ पासून ही संख्या दुप्पट झाली आहे. वाहनांच्या मालकीमध्ये सातत्याने होत असलेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर सरकारी मालकीच्या इंधन विक्रेत्या कंपन्यांनी बाजारातील आपला हिस्सा टिकवून ठेवण्यासाठी आणि ग्रामीण व महामार्गांपर्यंत इंधनाची उपलब्धता वाढवण्यासाठी आक्रमकपणे आऊटलेट्सचा विस्तार केला आहे.

अमेरिका, चीननंतर भारत तिसऱ्या क्रमांकावर

पेट्रोलियम मंत्रालयाच्या पेट्रोलियम नियोजन आणि विश्लेषण कक्षाकडून (पीपीएसी) उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार नोव्हेंबरच्या अखेरीस देशात १,००,२६६ पेट्रोल पंप आहेत, जे अमेरिका आणि चीननंतर तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे जाळे आहे, ज्यांचा भौगोलिक विस्तार भारतापेक्षा खूप मोठा आहे. अमेरिकेतील आउटलेट्सच्या संख्येबद्दल कोणताही अधिकृत डेटा नसला तरी, २०२४ च्या एका अहवालानुसार देशातील किरकोळ पेट्रोल पंपांची संख्या १,९६,६४३ होती. तेव्हापासून काही आउटलेट्स बंद झाली असावीत. चीनबद्दल, गेल्या वर्षीच्या एका अहवालात पेट्रोल पंपांची संख्या १,१५,२२८ असल्याचे म्हटले होते, तर चायना पेट्रोकेमिकल कॉर्पोरेशन (सिनोपेक) आपल्या वेबसाइटवर म्हणते की, ३०,००० पेक्षा जास्त कार्यरत पेट्रोल पंपांसह ती चीनमधील सर्वात मोठी इंधन किरकोळ विक्रेता आहे. सिनोपेक आकारमानाने मोठी असली तरी, तिच्या आउटलेट्सची संख्या भारतीय बाजारपेठेतील अग्रणी असलेल्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या (आयओसी) ४१,६६४ आउटलेट्ससमोर खूपच कमी वाटते.

९० टक्क्यांहून अधिक सरकारी कंपन्यांचे

भारतात इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (आयओसी), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) सारख्या सरकारी कंपन्यांच्या मालकीचे ९० टक्क्यांहून अधिक पंप आहेत. यात इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (आयओसी) ४१,६६४ पंपांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर, बीपीसीएलचे २४,६०५ पंपांसह दुसरे सर्वात मोठे नेटवर्क आहे, त्यानंतर एचपीसीएलचा क्रमांक लागतो, ज्याचे २४,४१८ आउटलेट्स आहेत. रशियाच्या रोसनेफ्ट-समर्थित नायरा एनर्जी लिमिटेड ही ६,९२१ आऊटलेट्ससह सर्वात मोठी खासगी इंधन विक्रेता कंपनी आहे, त्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बीपीच्या संयुक्त उपक्रमाच्या २,११४ पंपांचा क्रमांक लागतो. शेलचे ३४६ आऊटलेट्स आहेत. इंधन किरकोळ विक्री व्यवसायात खासगी क्षेत्राचा सहभाग आर्थिक वर्ष २००४ मध्ये २७ पंपांसह सुरू झाला होता.

दशकभरात दुप्पट वाढ

पीपीएसीच्या आकडेवारीनुसार, पेट्रोल पंपांचे जाळे २०१५ मधील ५०,४५१ पंपांवरून जवळपास दुप्पट झाले आहे. त्या वर्षी, खासगी कंपन्यांच्या मालकीच्या २,९६७ आऊटलेट्सचा वाटा जवळपास ५.९ टक्के होता. सध्या, त्यांचा एकूण बाजारात ९.३ टक्के वाटा आहे.

बांगलादेशातील हिंसाचारावर भारत आक्रमक; परराष्ट्र मंत्रालयाकडून कारवाईची मागणी, "अल्पसंख्याकांच्या विरोधातील शत्रुत्व...

पुण्याच्या राजकारणात मोठी घडामोड! प्रशांत जगताप यांनी धरला काँग्रेसचा 'हात', पक्षाची ताकद वाढणार?

अवघ्या १० वर्षांच्या श्रवण सिंगला राष्ट्रपतींच्या हस्ते 'प्रधानमंत्री बाल पुरस्कार'; म्हणाला, "मला स्वप्नातदेखील...

"रुग्णालयानेच त्याला मारले": कॅनडामधील भारतीय व्यक्तीच्या पत्नीने सांगितला ८ तासांचा भयावह अनुभव

Mumbai: शौचालय वापराचेही प्रमाणपत्र द्यावे लागणार; इच्छुकांची धावपळ सुरू