राष्ट्रीय

भारत सुपरपॉवर होण्याच्या मार्गावर; ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे प्रतिपादन

भारत आर्थिक महाशक्ती होण्याच्या मार्गावर आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही २०२८ पर्यंत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे, असे प्रतिपादन ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी गुरुवारी केले.

Swapnil S

मुंबई : भारत आर्थिक महाशक्ती होण्याच्या मार्गावर आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही २०२८ पर्यंत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे, असे प्रतिपादन ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी गुरुवारी केले. भारताच्या या प्रवासात ब्रिटनला भागीदार होण्यासाठी योग्य स्थान आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

स्टार्मर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी राजभवनात भेट घेऊन चर्चा केली. यावेळी उभय नेत्यांनी रशिया-युक्रेन संघर्षावरही चर्चा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्यात गुरुवारी व्यापक चर्चा झाली. ब्रिटनचे पंतप्रधान स्टार्मर हे १२५ हून अधिक प्रमुख उद्योगपती, उद्योजक आणि शिक्षणतज्ज्ञांच्या प्रतिनिधीमंडळासह बुधवारी सकाळी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर मुंबईत आले.

मोदींसोबतच्या चर्चेत भारत रशियाकडून तेल खरेदी करीत असल्याच्या मुद्द्याचा समावेश होता का? असा प्रश्न विचारल्यावर स्टार्मर म्हणाले, "आम्ही यावर चर्चा केली आणि विशेषतः आम्ही दोघांनी मिळून काय परिणाम आवश्यक आहे, हे पाहिले. रशिया व युक्रेन संघर्षाचा शेवट कसा करता येईल, याकडे पंतप्रधान मोदी आणि मी लक्ष केंद्रीत करत आहोत.

दरम्यान, ब्रिटन भारताला हलकी बहुद्देशीय क्षेपणास्त्र देण्यास तयार झाला आहे. तसेच संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळवून देण्यासाठी पाठिंबा देण्याची घोषणाही ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी केली. तसेच ब्रिटनची नऊ विद्यापीठे भारतात आपले कॅम्पस उघडणार आहेत.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, जुलै महिन्यात स्वाक्षरी झालेल्या ऐतिहासिक भारत-ब्रिटन सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करारामुळे दोन्ही देशांतील आयात खर्च कमी होईल. नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील, व्यापार वृद्धिंगत होईल आणि दोन्ही देशांतील उद्योग व ग्राहकांना लाभ होईल.

‘भारत आणि ब्रिटन हे नैसर्गिक भागीदार आहेत. आपले संबंध लोकशाही, स्वातंत्र्य आणि कायद्याच्या अधिनियमानुसार चालणाऱ्या समान मूल्यांवर आधारलेले आहेत. आजच्या जागतिक अनिश्चिततेच्या काळात आपली वाढती भागीदारी ही जागतिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीचा एक महत्त्वपूर्ण आधारस्तंभ आहे,' असे मोदी म्हणाले.

दोन्ही नेत्यांनी इंडो-प्रशांत क्षेत्रातील स्थिती, पश्चिम आशियातील शांतता व स्थैर्य, तसेच युक्रेनमधील सुरू असलेल्या संघर्षावरही विचारांची देवाणघेवाण केली.

युक्रेन संघर्ष आणि गाझा प्रश्नांवर भारत संवाद आणि कूटनीतीच्या माध्यमातून शांततेसाठी होणाऱ्या सर्व प्रयत्नांना पाठिंबा देतो. इंडो-प्रशांत क्षेत्रातील सागरी सुरक्षा सहकार्य वाढविण्याच्या दिशेने आम्ही पूर्णपणे वचनबद्ध आहोत, असे मोदी म्हणाले.

आपली भागीदारी विश्वासार्ह असून ती प्रतिभा आणि तंत्रज्ञानावर आधारित आहे. आज जेव्हा पंतप्रधान स्टार्मर आणि मी या व्यासपीठावर एकत्र उभे आहोत, तेव्हा ते दोन्ही राष्ट्रांच्या नागरिकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हातात हात घालून काम करण्याच्या आपल्या सामायिक बांधिलकीचे स्पष्ट पुनरुज्जीवन आहे, असे मोदी म्हणाले.

स्टार्मर यांचा हा दौरा भारत आणि ब्रिटनदरम्यान ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर दोन-अडीच महिन्यांनी होत आहे. या करारामुळे बाजारपेठ प्रवेश वाढेल, आयात शुल्क कमी होईल आणि २०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट होण्याची अपेक्षा आहे.

आपल्या वक्तव्यात स्टार्मर यांनी भारत-यूके भागीदारीला “विशेष” असे संबोधत ती भविष्याभिमुख आहे. भारताची विकासाची कहाणी विलक्षण आहे, असे त्यांनी नमूद केले.

‘नैसर्गिक भागीदार’

भारत आणि ब्रिटन हे ‘नैसर्गिक भागीदार’ आहेत आणि आजच्या अस्थिर जागतिक परिस्थितीत दोन्ही देशांमधील वाढते संबंध हे जागतिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीचे एक महत्त्वाचे स्तंभ आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सांगितले.

उड्डाण प्रशिक्षक ब्रिटनमध्ये शिकवणार

आपण संरक्षण क्षेत्रात सह-उत्पादनाच्या दिशेने वाटचाल करत आहोत आणि दोन्ही देशांच्या संरक्षण उद्योगांना जोडत आहोत. आपल्या संरक्षण सहकार्याला आणखी एक पाऊल पुढे नेत, आम्ही लष्करी प्रशिक्षण सहकार्यासाठी करार केला आहे, ज्याअंतर्गत भारतीय हवाई दलाचे उड्डाण प्रशिक्षक हे ब्रिटनच्या ‘रॉयल एअर फोर्स’मध्ये प्रशिक्षक म्हणून कार्य करतील, असे त्यांनी सांगितले.

AQI १०५ वर पोहोचला! मुंबईत हवेची गुणवत्ता घसरली; हिवाळ्यात प्रदूषणाचा उच्चांक गाठण्याची शक्यता

उमेश कोल्हे हत्याकांड : विशेष NIA न्यायालयाने शकील शेखचा फेटाळला जामीन

Mumbai Metro 3 : पहिल्याच दिवशी चर्चगेट स्थानकावर प्रवाशांची मोठी गैरसोय, व्हिडिओ व्हायरल

२०२२ पूर्वी भ्रूण गोठवले असल्यास सरोगसी कायद्यातून सूट; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

ई-बस प्रवाशांसाठी खुशखबर; एसटीकडून मासिक व त्रैमासिक पास योजना