नवी दिल्ली : भारत आणि अमेरिका यांच्यातील अंतरिम व्यापार करार मार्चमध्ये स्वाक्षरी होण्याची आणि एप्रिलपासून अंमलात येण्याची शक्यता असल्याचे वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी शुक्रवारी सांगितले.
द्विपक्षीय व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्याचा मजकूर अंतिम करण्यासाठी दोन्ही देशांचे मुख्य वाटाघाटीकारक पुढील आठवड्यात वॉशिंग्टनमध्ये भेटणार आहेत. दोन्ही पथकांमधील तीन दिवसांची बैठक २३ फेब्रुवारीपासून सुरू होईल.
गोयल यांनी पत्रकारांना सांगितले की, या करारावर पुढील महिन्यात स्वाक्षरी होण्याची अपेक्षा असून एप्रिलमध्ये अंमलात येऊ शकतो. अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर हे मार्चमध्ये भारत दौऱ्यावर येऊन करारावर स्वाक्षरी करतील, अशी शक्यता आहे.
येथे झालेल्या ‘एआय इम्पॅक्ट समिट’मध्ये अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी भारत-अमेरिका व्यापार करार लवकरच अंतिम होणार असल्याचे सांगितले.
या करारांतर्गत दोन्ही देश एकमेकांना अनेक वस्तूंवर सीमाशुल्क सवलती देतील. अमेरिकेने भारतीय वस्तूंवरील परस्पर शुल्क २५ वरून १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्याची घोषणा केली आहे. रशियन कच्च्या तेलाच्या खरेदीमुळे भारतावर लावलेले २५ टक्के दंडात्मक शुल्क अमेरिकेने आधीच रद्द केले आहे. त्यामुळे देशांतर्गत उद्योगाला मोठा दिलासा मिळाला असून, अन्यथा ५० टक्केपर्यंत शुल्काचा सामना करावा लागला असता.
फेब्रुवारीत आयात शुल्क १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्याबाबत कार्यकारी आदेश जारी करेल, अशी आशा गोयल यांनी व्यक्त केली.
२५,०६० कोटी रुपयांच्या निर्यात प्रोत्साहन मोहिमेच्या सात घटकांच्या शुभारंभावेळी बोलताना गोयल म्हणाले की भारत-अमेरिका व्यापार करारामुळे भारतीय निर्यातदारांसाठी मोठ्या व्यावसायिक संधी उपलब्ध झाल्या आहेत. शेतीसह सर्व संवेदनशील क्षेत्रांचे संरक्षण करण्यात आले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जेव्हा ५० टक्के शुल्क १८ टक्क्यांवर येईल, तेव्हा आपण इतर उदयोन्मुख व विकसनशील अर्थव्यवस्थांपेक्षा अधिक स्पर्धात्मक ठरू. संवेदनशील क्षेत्रांचे संरक्षण करून हा दोन्ही देशांसाठी ‘विन-विन’ उपाय आहे, असे ते म्हणाले.
या करारामुळे रत्न व दागिने, मसाले यांची निर्यात वाढण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. आयातीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की भारताला जीपीयू, कोकिंग कोळसा आणि विमाने यांसारखी उच्च-तंत्रज्ञान उत्पादने आवश्यक आहेत. पुढील ५-६ वर्षांत पोलाद उत्पादन १४० दशलक्ष टनांवरून ३०० दशलक्ष टनांपर्यंत दुप्पट होणार असून, त्यासाठी मोठ्या गुंतवणुकीची गरज आहे आणि त्यात कोकिंग कोळसा महत्त्वाचा ठरेल, असेही त्यांनी सांगितले.