नवी दिल्ली : पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली भारतीय नौदलाचा लान्स नायक आदर्श कुमार उर्फ लकी याला मंगळवारी उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) आग्रा येथून अटक केली आहे.
लकी याला एटीएसने लखनऊ येथे आणले असून त्याची सखोल चौकशी करण्यात आली आणि नंतर त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. एटीएसच्या मते, केरळच्या कोची येथील दक्षिण नौदल कमांडमध्ये लान्स नायक म्हणून तैनात असलेला आग्र्याचा रहिवासी आदर्श कुमार उर्फ लकी हा आयएसआयला धोरणात्मक महत्त्वाची माहिती देतहोता. तपासात असे दिसून आले की, त्याने त्याच्या आयएसआय हँडलरला संवेदनशील युद्धनौकांचे फोटो आणि ठिकाणे पाठवली होती, त्या बदल्यात पैसे त्याच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले जात होते.
एजंटने पैसे पाठवल्याची खातरजमा झाल्यानंतर त्याला अटक
एटीएस एका पाकिस्तानी एजंटवर लक्ष ठेवून होते. तपासादरम्यान आदर्श कुमारचे नाव समोर आलंय. त्यानंतर एटीएसने भौतिक आणि इलेक्ट्रॉनिक देखरेखीचा वापर करून त्याच्यावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. त्याच्या बँक खात्यांचीही चौकशी करण्यात आलीय आणि आयएसआय एजंटने पैसे पाठवल्याची खातरजमा झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आलीय. एटीएस त्याला रिमांडवर घेऊन चौकशी करणार आहे.
धोरणात्मकदृष्ट्या संवेदनशील माहिती शेअर केल्याच्या आरोप
गेल्या काही दिवसांपूर्वी राजस्थानमधील गुप्तचर अधिकाऱ्यांनी जैसलमेर भागातील एका व्यक्तीला पाकिस्तानच्या आयएसआयच्या हँडलर्सना भारतीय सैन्याशी संबंधित धोरणात्मकदृष्ट्या संवेदनशील माहिती शेअर केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. जैसलमेरमधील नेदान गावातील रहिवासी असलेला आरोपी झब्राराम हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे पाकिस्तानी गुप्तचर हँडलर्सशी सतत संपर्कात होता. जयपूरमधील चौकशी केंद्रात अनेक तपास संस्थांनी केलेल्या संयुक्त चौकशीदरम्यान असे उघड झाले की, झब्रारामला आयएसआय हँडलर्सनी हनीट्रॅपमध्ये अडकवले होते, त्यानंतर त्याने पैशाच्या बदल्यात भारतीय सैन्याशी संबंधित संवेदनशील माहिती शेअर करण्यास सुरुवात केलीय.