फुकट्या प्रवाशांना चाप! विनातिकीट प्रवाशाला मोजावे लागणार दुप्पट पैसे; रेल्वेचा नवा नियम लागू  'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
राष्ट्रीय

फुकट्या प्रवाशांना चाप! विनातिकीट प्रवाशाला मोजावे लागणार दुप्पट पैसे; रेल्वेचा नवा नियम लागू

भारतीय रेल्वेने विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात कठोर पाऊल उचललं आहे. रेल्वेने अशा प्रवाशांवरील किमान दंडाची रक्कम दुप्पट केली असून आजपासून (२० जून) नवीन नियम लागू झाला आहे.

Mayuri Gawade

भारतीय रेल्वेने विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात कठोर पाऊल उचललं आहे. रेल्वेने अशा प्रवाशांवरील किमान दंडाची रक्कम दुप्पट केली असून आजपासून (२० जून) नवीन नियम लागू झाला आहे.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, जन विश्वास कायदा, २०२६ अंतर्गत रेल्वे कायदा १९८९ मधील कलम १३७ आणि १३८ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. याआधी विनातिकीट प्रवासासाठी किमान २५० रुपये दंड आकारला जात होता. मात्र, आता तिकीटाशिवाय प्रवास करताना पकडल्यास किमान ५०० रुपये दंड भरावा लागणार आहे. रेल्वे मंत्रालयाने १९ जून रोजी यासंदर्भातील अधिसूचना जारी केली असून आज २० जूनपासून या नियमांची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

कोणत्या प्रवाशांवर होणार कारवाई?

वैध तिकीट किंवा पास नसताना रेल्वेत प्रवास करणे, आधी वापरलेले तिकीट पुन्हा वापरण्याचा प्रयत्न करणे किंवा रेल्वे नियमांचे उल्लंघन करून प्रवास करणे या प्रकारांवर कारवाई केली जाणार आहे.

तिकीट नसेल तर किती पैसे मोजावे लागतील?

विनातिकीट प्रवास करताना पकडल्यास संबंधित प्रवाशाला तिकीटाइतकी रक्कम आणि अतिरिक्त दंडही भरावा लागेल. प्रवासी नेमका कुठून गाडीत चढला हे स्पष्ट नसेल तर रेल्वे प्रशासन गाडीच्या सुरुवातीच्या स्थानकापासूनचे भाडे आकारू शकते. तसेच प्रवासादरम्यान तिकीट तपासणी झाली असेल, तर शेवटची तपासणी ज्या स्थानकात झाली त्या ठिकाणापासूनचे भाडेही आकारले जाऊ शकते.

दंड न भरल्यास कारवाई

रेल्वे अधिकाऱ्यांनी मागितलेली रक्कम भरण्यास प्रवाशाने नकार दिल्यास प्रकरण न्यायालयात जाऊ शकते. न्यायालयाच्या आदेशानंतरही रक्कम भरली नाही तर संबंधित व्यक्तीला सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवास, ५०० रुपयांपर्यंत अतिरिक्त दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

रेल्वेने का घेतला निर्णय?

रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, मध्य रेल्वेने मे महिन्यातच सुमारे ४.९६ लाख विनातिकीट प्रवाशांविरोधात कारवाई करत ४०.८५ कोटी रुपयांचा दंड वसूल केला होता. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी दंडाची रक्कम वाढवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, रेल्वेने प्रवाशांना वैध तिकीट घेऊनच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी

Mumbai : ‘बटरफ्लाय’ रोखणार पाणी गळती; जलवाहिन्यांवर बटरफ्लाय झडपा बसवणार, गणेश खणकर यांच्या मागणीची दखल

Mumbai : चौपाटी, विसर्जनस्थळी चोख व्यवस्थापन; देशभरातील तज्ज्ञांकडून पालिका, पोलिसांचे कौतुक

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग