राष्ट्रीय

जागतिक अन्न व पोषण सुरक्षेसाठी भारताचे प्रयत्न; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

भारताकडे अन्नधान्याचा विपुल साठा असून आम्ही आता जागतिक अन्न व पोषण सुरक्षेसाठी प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

Swapnil S

नवी दिल्ली : भारताकडे अन्नधान्याचा विपुल साठा असून आम्ही आता जागतिक अन्न व पोषण सुरक्षेसाठी प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

भारतात ६५ वर्षांनंतर ३२ वी आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ज्ञांची परिषद आयोजित केली होती. या परिषदेत पंतप्रधान मोदी यांनी मार्गदर्शन केले. ७० देशांतील १ हजार तज्ज्ञ उपस्थित होते.

ते म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्थेच्या धोरणात कृषीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यंदाच्या अर्थसंकल्पातही भारताने शाश्वत व वातावरण बदलाला सामोरे जाव्या लागणाऱ्या शेतीला चालना देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. भारतीय शेतकऱ्यांना मदत करणारी पुरवठा साखळी आम्ही विकसित करत आहोत. भारत हा केवळ शेतीच नव्हे, तर दूध उत्पादन, कडधान्य व मसाल्यांच्या उत्पादनात जगात क्रमांक एकवर आहे. तसेच अन्नधान्य, फळे, भाज्या, कापूस, साखर व चहा उत्पादनात भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आता जगाला भेडसावणाऱ्या अन्न सुरक्षेची भारताला चिंता आहे. भारत जगाच्या अन्न सुरक्षेसाठी प्रयत्नशील आहे. इतकेच नव्हे, तर जागतिक पोषक अन्नधान्यासाठी भारत काम करत आहे, असे त्यांनी सांगितले.

भारतात शेती व संशोधनाशी संबंधित मोठी यंत्रणा कार्यरत आहे. भारतीय शेती संशोधन परिषदेच्या १०० हून अधिक संशोधन संस्था आहेत. भारतात शेती व संबंधित ५०० अधिक महाविद्यालये आहेत, तर ७०० हून अधिक कृषी विज्ञान केंद्रे आहेत. ही केंद्रे शेतकऱ्यांपर्यंत नवीन तंत्रज्ञान पोहचवण्यास मदत करतात, असे मोदी म्हणाले.

भारतात गेल्या वेळेस आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ज्ञांची परिषद झाली होती. तेव्हा भारतात शेती व अन्न सुरक्षेची परिस्थिती गंभीर होती. भारताला तेव्हा स्वातंत्र्य मिळाले होते. आता भारत पूर्ण बदलला असून अनेक शेती उत्पादनात आघाडीवर आहे, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन

भारतातील ९० टक्के शेतकऱ्यांकडे अल्प जमीन आहे. हे छोटे शेतकरी भारताच्या अन्न सुरक्षेला बळकट करत आहेत. गेल्या दहा वर्षांत वातावरण बदलाला तोंड देणाऱ्या १९०० नवीन पिके भारताने तयार केली आहेत. भारत आता सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देत आहे, असे मोदी म्हणाले.

Maratha Reservation : सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक विस्कळीत; CSMT परिसरात आंदोलकांचे बस्तान

Maratha Reservation: आंदोलनाची धग वाढणार; मनोज जरांगे आजपासून पाणी पिणेही बंद करणार; एकतर विजययात्रा, नाहीतर अंत्ययात्रा

Maratha Reservation : दक्षिण मुंबईत आज पुन्हा कोंडीची शक्यता

Maratha Reservation : CSMT परिसरात अस्वच्छता; राज्यभरातून अन्नपदार्थांचा ओघ वाढल्याने नासाडी

Maratha reservation protest : सुप्रिया सुळेंना आंदोलकांचा घेराव; गाडीवर बाटल्या भिरकावल्या