राष्ट्रीय

भारताची 'जीडीपी'वाढ दशकातील सुधारणांचे प्रतिबिंब - 'इन्फिनिटी फोरम २.०' परिषदेत पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन

या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत भारताने ७.७ टक्के जीडीपी वाढ केली आहे. आज संपूर्ण जगाने भारतावर आशा ठेवल्या आहेत आणि हे आपोआप घडले नाही

नवशक्ती Web Desk

गांधीनगर : चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत भारताचे सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) ७.७ टक्क्यांनी वाढले आहे. हे देशाच्या मजबूत होत असलेल्या अर्थव्यवस्थेचे आणि गेल्या १० वर्षांत केलेल्या परिवर्तनात्मक सुधारणांचे प्रतिबिंब आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

गुजरातमधील गांधीनगरमधील गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक (गिफ्ट) सिटी येथे आयोजित करण्यात आलेल्या 'इन्फिनिटी फोरम २.०' परिषदेला पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी व्हिडीओ लिंकद्वारे संबोधित केले. त्यावेळी त्यांनी हे विचार मांडले. सरकार गिफ्ट सिटीला नव्या युगाच्या जागतिक वित्तीय आणि तंत्रज्ञान सेवांचे केंद्र बनवू इच्छित आहे, असे ते म्हणाले.

या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत भारताने ७.७ टक्के जीडीपी वाढ केली आहे. आज संपूर्ण जगाने भारतावर आशा ठेवल्या आहेत आणि हे आपोआप घडले नाही. भारताच्या बळकट होत असलेल्या अर्थव्यवस्थेचे आणि गेल्या १० वर्षांत करण्यात आलेल्या परिवर्तनात्मक सुधारणांचे हे प्रतिबिंब आहे. भारत आज जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या फिनटेक बाजारपेठांपैकी एक आहे आणि गिफ्ट इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर त्याचे केंद्र म्हणून उदयास येत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

ग्रीन क्रेडिट्ससाठी बाजारपेठ व्यवस्था विकसित करण्याबाबत तज्ज्ञांनी त्यांच्या कल्पना मांडण्याचे आवाहन त्यांनी केले. राज्याच्या पारंपरिक गरबा नृत्याचा समावेश युनेस्कोच्या 'मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या प्रतिनिधी सूची'मध्ये करण्यात आला त्याबद्दल मोदी यांनी गुजरातमधील लोकांचे अभिनंदन केले.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस