मुंबई : देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगोची विमानसेवा सलग तिसऱ्या दिवशी, गुरुवारीही विस्कळीत राहिली. देशभरात ५५० विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली. एकूण उड्डाणांपैकी दिल्ली, मुंबई, अहमदाबाद आणि हैदराबाद येथे किमान १९१ उड्डाणे रद्द करण्यात आली, ज्यामुळे विमानतळांवर गोंधळ निर्माण झाला.
मनुष्यबळाच्या अभावामुळे विमानतळावरील कामकाजात अडथळे येत असल्याचे स्पष्टीकरण कंपनीकडून देण्यात येत असले तरी सलग तिसऱ्या दिवशी वेगवेगळ्या शहरांमध्ये इंडिगोच्या हजारो प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. विमानांची उड्डाणे रद्द होण्याबरोबरच वेगवेगळ्या विमानतळांवर विमानांच्या उड्डाणांना विलंबही झाला.
गेल्या तीन दिवसांपासून प्रामुख्याने अपुरे मनुष्यबळ आणि वेळापत्रकात करावे लागणारे समायोजन यामुळे इंडिगोची विमानसेवा विस्कळीत झाली आहे. उड्डाणे रद्द झाल्यामुळे विमानतळांवर सर्वत्र प्रवाशांची गर्दी, गोंधळ आणि मनस्ताप असे चित्र दिसले.
कामकाज सुरळीत करण्यासाठी प्रयत्न
इंडिगोचे कामकाज सुरळीत करण्यासाठी आणि वेळापत्रक सावरण्यासाठी आम्ही काम करत आहोत, अशी माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पीटर एल्बर्स यांनी गुरुवारी दिली. मात्र हे लक्ष्य सोपे नाही, असे त्यांनी इंडिगोच्या कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या संदेशात नमूद केले. प्रवाशांना चांगली सेवा देण्याचे वचन पूर्ण करू शकलो नाही, अशी खंत त्यांनी त्यामध्ये व्यक्त केली आहे.