राष्ट्रीय

महागाईनेही नऊ वर्षांचा उच्चांक गाठला महागाईचा दर एप्रिलमध्ये १५.०८ टक्क्यांवर

वृत्तसंस्था

गेल्या काही दिवसांत देशातील जनतेला महागाईच्या आघाडीवर एकापाठोपाठ एक मोठे धक्के बसत आहेत. वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्याचे सरकारचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरल्याने महागाईचा भडका उडाला आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणूस त्यात होरपळून निघत आहे. नुकताच किरकोळ महागाई दर आठ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला होता आणि आता घाऊक महागाईनेही नऊ वर्षांचा उच्चांक गाठला आहे. मंगळवारी सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, घाऊक महागाईचा दर एप्रिलमध्ये १५.०८ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या महिन्यात मार्चमध्ये तो १४.५५ टक्के आणि फेब्रुवारीमध्ये १३.११ टक्के होता. सलग १३ व्या महिन्यात घाऊक महागाईने दोन अंकी दर नोंदवला आहे.

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वच वस्तू महाग झाल्याचा हा परिणाम आहे. तज्ज्ञांच्या मते, अन्न आणि इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे महागाई वाढत आहे. अन्नधान्यापासून विविध वस्तूंच्या किमतीत झालेल्या वाढीच्या परिणामी घाऊक महागाईने नवा विक्रमी स्तर गाठला आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत घाऊक महागाई दर १०.७४ टक्के होता. घाऊक महागाई गेल्या वर्षी एप्रिलपासून सलग १३व्या महिन्यात दुहेरी अंकात राहिली आहे.

दरवाढीमुळे महागाईत वाढ,

वाणिज्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण

किरकोळ विक्रीनंतर घाऊक महागाईत झालेल्या या मोठ्या वाढीबद्दल वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, एप्रिल २०२२ मध्ये महागाईचा उच्च दर मुख्यत्वे खनिज तेल, मूलभूत धातू, कच्चे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, खाद्यपदार्थ, बिगर खाद्यपदार्थ, अन्नपदार्थ आणि रसायने व रासायनिक उत्पादनांच्या किमती वाढल्यामुळे झाला आहे.

अन्नधान्य, खाद्यपदार्थांत मोठी भाववाढ

सरकारी आकडेवारीनुसार, भाजीपाला, गहू, फळे आणि बटाटे यांच्या किमतीत वर्षभरापूर्वीच्या तुलनेत मोठी वाढ झाल्याने खाद्यपदार्थांची महागाई ८.३५ टक्के राहिली. याशिवाय, इंधन आणि ऊर्जेची महागाई ३८.६६ टक्के होती, तर उत्पादित उत्पादने आणि तेलबियांमध्ये ती अनुक्रमे १०.८५ टक्के आणि १६.१० टक्के होती. कच्च्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूच्या महागाईचा दर एप्रिलमध्ये ६९.०७ टक्के होता.

किरकोळ महागाईही

आठ वर्षांच्या उच्चांकावर

विशेष म्हणजे, सरकारने गेल्या आठवड्यात जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिलमध्ये देशातील किरकोळ महागाईही आठ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. मार्चमध्ये ६.९५ टक्क्यांच्या तुलनेत एप्रिलमध्ये किरकोळ महागाई दर ७.७९ टक्के इतका वाढला आहे. किरकोळ महागाई दर सलग चौथ्या महिन्यात रिझर्व्ह बँकेच्या महागाईच्या लक्ष्यापेक्षा जास्त आहे.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन