नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) शुक्रवारी विद्यमान विस्तारित निधी सुविधेअंतर्गत पाकिस्तानला १ अब्ज अमेरिकन डॉलरचे कर्ज तत्काळ जारी करण्यास मान्यता दिली. भारताने पाकिस्तानला दिलेल्या कर्जाला कडाडून विरोध केला आणि मतदानातही भाग घेतला नाही.
पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, 'पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आयएमएफने पाकिस्तानसाठी एक अब्ज डॉलर्सच्या मदतीच्या मंजुरीबद्दल समाधान व्यक्त केले. पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती सुधारत असून देश विकासाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले.
पाकिस्तान या निधीचा वापर दहशतवादी कारवायांना पाठिंबा देण्यासाठी करत असल्याची शक्यता भारताकडून व्यक्त करण्यात आली आणि त्याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानला कर्ज देण्यास भारताने विरोध केला होता, तर आयएमएफच्या मतदानासाठीही भारत अनुपस्थित राहिला होता. शुक्रवारी झालेल्या बैठकीत भारताने आपला दृष्टिकोन मांडताना पाकिस्तानचा खराब ट्रॅक रेकॉर्ड आणि राज्य-पुरस्कृत दहशतवादासाठी निधीचा गैरवापर होण्याची शक्यता उद्धृत केली.