बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खान सध्या एका मोठ्या वादात अडकला आहे. आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स (KKR) या आपल्या संघासाठी बांगलादेशी क्रिकेटपटू मुस्तफिजुर रहमानला संघात घेण्याच्या निर्णयामुळे शाहरुखवर टीकेची झोड उठली आहे. बांगलादेशात सध्या हिंदूंवर होत असलेल्या कथित अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याने अनेक संघटनांनी संताप व्यक्त केला आहे.
भाजप नेते संगीत सोम यांनी या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी एएनआयशी बोलताना बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या कथित अत्याचारांचा उल्लेख करत शाहरुख खानवर जोरदार टीका केली. बांगलादेशात हिंदूंवर हल्ले, महिला व मुलींवर अत्याचार, घरे जाळणे आणि भारतविरोधी घोषणा होत असल्याचा आरोप त्यांनी केला. आध्यात्मिक गुरु देवकीनंदन ठाकूर यांनी केलेल्या दाव्यानुसार, हिंदू महासभेने या निर्णयाचा तीव्र निषेध केला. तसेच, शाहरुख खानला थेट बांगलादेशात पाठवण्याची मागणी केली आहे.
शाहरुख खानवर टीका करत संगीत सोम म्हणाले की, "भारताने आणि भारतीय जनतेने दिलेल्या प्रेमामुळे शाहरुख खान यशस्वी झाला, मात्र तो पैसे अशा देशाच्या खेळाडूंवर खर्च करत आहे जे भारताविरुद्ध काम करत आहेत. त्यांनी शाहरुख खानला थेट देशद्रोही म्हटले असून, कोणत्याही परिस्थितीत मुस्तफिजुर रहमानला भारतात खेळू दिले जाणार नाही, असा दावा त्यांनी केला आहे. रहमान विमानतळाबाहेरही येऊ शकणार नाही, असेही त्यांनी म्हटले.
हिंदू महासभेच्या जिल्हाध्यक्ष मीरा राठोड यांनी वादग्रस्त विधान करत शाहरुख खानची जीभ कापणाऱ्याला एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. त्यामुळे या प्रकरणाला अधिकच गंभीर वळण आले आहे. अखिल भारतीय हिंदू महासभा आग्रा जिल्हा अध्यक्षा मीरा राठोड यांनी सांगितले की, "बांगलादेशात हिंदूंना जाळून मारण्यात आलं आणि हा माणूस तिथल्याच लोकांना खेळण्यासाठी विकत घेतो. हिंदूंच्याबाबतीत जे घडतंय ते चुकीचं आहे. जो कोणी शाहरुख खानची जीभ छाटेल, त्याला आम्ही एक लाखांचे बक्षीस देऊ."
गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात हिंसाचाराच्या घटना वाढल्याचा दावा केला जात असून हिंदूंवर अन्याय होत असल्याचे आरोप करण्यात येत आहेत. दीपू दास नावाच्या एका हिंदू युवकाच्या भररस्त्यात झालेल्या हत्येनंतर अनेक कलाकार आणि सामाजिक संघटनांनी निषेध नोंदवला होता. अशा वातावरणात शाहरुख खानने बांगलादेशी खेळाडूला आपल्या संघात घेतल्याने लोकांमधील रोष वाढताना दिसत आहे.
BCCI कडून भूमिका स्पष्ट
आयपीएलमध्ये बांगलादेशी क्रिकेटपटू मुस्तफिजुर रहमानच्या सहभागावरून सुरू झालेल्या वादावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सध्या बीसीसीआयने ‘थांबा आणि वाट पहा’ हे धोरण स्वीकारले असून, सरकारच्या स्पष्ट सूचनांशिवाय कोणत्याही खेळाडूवर बंदी घालण्यात येणार नसल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘इनसाइड स्पोर्ट’शी बोलताना सांगितले की, परिस्थिती संवेदनशील आहे आणि बोर्ड सरकारच्या सातत्याने संपर्कात आहे. सध्या बांगलादेशी खेळाडूंवर बंदी घालण्याचा कोणताही विचार नाही. मुस्तफिजुर रहमान आयपीएलमध्ये खेळेल, कारण बांगलादेश हा भारताचा शत्रू देश नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच टी-२० विश्वचषक २०२६च्या पार्श्वभूमीवर बांगलादेशी खेळाडूंना देण्यात येणाऱ्या व्हिसाबाबत परराष्ट्र मंत्रालयाशी (MEA) चर्चा सुरू असल्याची माहितीही देण्यात आली आहे.