दिल्लीतील हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकावर शनिवारी एक धक्कादायक प्रकार घडला. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी)च्या दोन गटांतील कर्मचाऱ्यांमध्ये अचानक झालेल्या वादाचं थेट हाणामारीत रूपांतर झालं. ही झटापट प्रवाशांसमोरच झाली असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं?
व्हिडिओमध्ये युनिफॉर्ममधील काही कर्मचारी एकमेकांवर थेट धक्काबुक्की, ठोसेबाजी आणि अगदी डस्टबिन फेकताना दिसतात. काहींनी तर आपला बेल्ट शस्त्रासारखा वापरल्याचं दिसतं. सुरुवातीला झालेला साधा वाद एका कर्मचाऱ्याने दुसऱ्यावर डस्टबिन फेकल्यानंतर अचानकच उग्र झाला आणि दोन्ही बाजूंनी मारामारी सुरू झाली. प्रवासी आणि इतर रेल्वे कर्मचारी या गोंधळाने थक्क झाले, तर पोलिसांनी धाव घेत हस्तक्षेप करून परिस्थिती आटोक्यात आणली.
आयआरसीटीसीची कारवाई
या घटनेनंतर आयआरसीटीसीने तत्काळ कठोर कारवाई केली आहे. रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) ४ कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले. आयआरसीटीसीने एक्स (पूर्वीचे ट्विटर)वर पोस्ट करत म्हटले, “हा प्रकार अत्यंत गंभीरतेने घेतला गेला आहे. संबंधित कर्मचाऱ्यांची ओळखपत्रं रद्द करण्यात आली असून, त्यांना सेवेतून वगळण्यात आलं आहे. सेवा पुरवठादार संस्थेला ५ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, करार रद्द करण्यासाठी कारण दाखवा नोटीस देण्यात आली आहे.”
किरकोळ कारणावरून वाद
हा वाद खरं तर किरकोळ कारणावरून झाला होता. खजुराहो वंदे भारत एक्सप्रेसच्या पॅन्ट्री सहाय्यकांमध्ये ‘पाण्याच्या बाटल्या ट्रेनमध्ये ठेवण्यावरून’ हा वाद झाला. काही वेळातच मौखिक वाद हाणामारीत बदलला.
प्रवाशांमध्ये चर्चेचा विषय
हा संपूर्ण प्रकार प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वर घडला असून, काही क्षणांतच गोंधळ उडाला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटिझन्सनी या घटनेवर विनोदी प्रतिक्रिया दिल्या. एका वापरकर्त्याने लिहिलं, “हे तर ‘बॅटल ऑफ बागपत’चं दिल्ली व्हर्जन वाटतंय.” तर दुसऱ्याने म्हटलं, “इथे तर बेल्ट ट्रीटमेंट सुरू आहे.” आणखी एका वापरकर्त्याने लिहिलं, “आयआरसीटीसीने प्रवाशांच्या प्रतीक्षेत WWE लेव्हलचं मनोरंजन मोफत सुरू केलंय!”