राष्ट्रीय

विमानांना धमक्या रोखण्यासाठी कोणती पावले उचलली? आयटी मंत्रालयाची X आणि Meta ला विचारणा

विमानांना बहुतांश धमक्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातूनच येत असल्याने आयटी मंत्रालयाने बुधवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X आणि मेटा यांच्यासह एअरलाइन कंपन्यांसोबत आभासी बैठक घेतली.

Swapnil S

नवी दिल्ली : विमानात बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी देणाऱ्या अफवांचे प्रमाण सध्या वाढत चालले असून, अशा प्रकारच्या अफवा रोखण्यासाठी तुम्ही कोणती पावले उचलली, अशी विचारणा बुधवारी माहिती-तंत्रज्ञान (आयटी) मंत्रालयाने समाज माध्यम व्यासपीठ असलेल्या ‘एक्स’ आणि ‘मेटा’ यांना केली. तुम्ही अशा प्रकारच्या गुन्ह्यांना प्रोत्साहनच देत होता, असे परिस्थितीवरून स्पष्ट होत आहे, असे म्हणत मंत्रालयाने एकप्रकारे संतापच व्यक्त केला.

विमानांना बहुतांश धमक्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातूनच येत असल्याने आयटी मंत्रालयाने बुधवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X आणि मेटा यांच्यासह एअरलाइन कंपन्यांसोबत आभासी बैठक घेतली. यावेळी सोशल मीडिया कंपन्यांच्या प्रतिनिधींना खोट्या माहितीच्या प्रसाराबद्दल विचारणा झाली. तसेच, फसव्या बॉम्बच्या धमक्यांविरूद्ध ठोस उपाययोजना करण्यास सांगण्यात आले आहे.

गेल्या नऊ दिवसांमध्ये १७० हून अधिक विमानांना बॉम्ब ठेवण्यात आल्याच्या धमकीचे संदेश पाठविण्यात आले. त्यामुळे विमान वाहतूक क्षेत्राला जवळपास ६०० कोटी रुपयांचा फटका बसला. देशातील प्रवासी विमानांना धमक्या देण्याची मालिका सुरूच आहे. मंगळवारीही ५० हून अधिक विमानांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या होत्या. यामध्ये एअर इंडिया आणि इंडिगोची प्रत्येकी १३ उड्डाणे, अकासा एअरच्या १२ हून अधिक उड्डाणांना आणि विस्ताराच्या ११ उड्डाणांना धमक्या आल्या होत्या.

केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री राममोहन नायडू यांनी अलीकडेच स्पष्ट केले होते की, अशा धमक्या देणाऱ्यांची नावे 'नो फ्लाय लिस्ट'मध्ये समाविष्ट केली जाऊ शकतात. सरकार विमान वाहतूक सुरक्षा नियम आणि नागरी विमान वाहतूक सुरक्षेविरोधात बेकायदेशीर कृत्यांचे दमन अधिनियम १९८२ मध्ये सुधारणा करण्याची योजना आखत आहे.

विमान कंपन्यांना कोट्यवधींचा फटका

विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळताच विमान त्याच्या नियोजित विमानतळाऐवजी जवळच्या विमानतळावर उतरवण्यात येते. यामुळे केवळ इंधनाचा वापर जास्त होत नाही, तर विमानाची पुन्हा तपासणी करणे, प्रवाशांची हॉटेलमध्ये व्यवस्था करणे आणि त्यांना त्यांच्या गंतव्यस्थानी नेण्याची व्यवस्था करणे यापोटी एका उड्डाणासाठी सुमारे तीन कोटी रुपये खर्च येतो.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

सावत्र भावांना बहिणींनी जोडा दाखवला - मुख्यमंत्री

तुष्टीकरणाला उत्तर कसे द्यायचे हे महाराष्ट्राने दाखवले - मोदी

भारतीय संघाची सामन्यावर पकड;जयस्वाल, राहुल यांची नाबाद अर्धशतके; बुमराच्या विकेटचे पंचक