झारखंडमधील देवघर येथील एम्स रोडजवळील जसीडीह-मधुपुर मार्गावरील रोहिणी-नवाडीह रेल्वे क्रॉसिंगवर गुरुवारी (दि.२२) सकाळी मोठा रेल्वे अपघात थोडक्यात टळला. गोंडा-आसनसोल एक्स्प्रेसने सकाळी रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या एका ट्रकला धडक दिली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, वाहनांचे नुकसान झाले आहे.
एक्स्प्रेसची ट्रकला धडक
माहितीनुसार, गोंडा-आसनसोल एक्स्प्रेस (क्रमांक १३५१०) सकाळी ९.३८ वाजता डाउन लाईनवरून जात असताना, रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या तांदळाने भरलेल्या एका ट्रकला (क्रमांक JH15X-8874) धडकली. या अपघातानंतर अप आणि डाउन दोन्ही रेल्वे लाईनवरील वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली होती. रेल्वे अधिकाऱ्यांनी तातडीने परिस्थिती हाताळत अप लाईन १०.५५ वाजता सुरू केली. त्यानंतर आसनसोल-झाझा पॅसेंजर ट्रेनला सावकाश पुढे जाण्याची परवानगी देण्यात आली.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडिओमध्ये एक्स्प्रेस ट्रेनने ट्रकला दिलेली धडक स्पष्ट दिसते. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, त्यावेळी क्रॉसिंगवर वाहनांची गर्दी होती.
"सिग्नल दिला नव्हता; तरीही...
गेटकीपर पंकज कुमार यांनी सांगितले की, “क्रॉसिंगवर गर्दी असल्याने ट्रेनला सिग्नल देण्यात आला नव्हता. तरीही गोंडा-आसनसोल एक्स्प्रेस डाउन लाईनवर आली आणि ट्रकला धडकली.”
सुदैवाने जीवितहानी टळली...
मिळालेल्या माहितीनुसार, धडकेदरम्यान दोन मोटारसायकलींनाही ट्रकने धडक दिली. मात्र, सुदैवाने मोटारसायकलस्वार वेळीच बाजूला झाले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेनंतर, रेल्वे अधिकारी, आरपीएफ आणि स्थानिक पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचून त्यांनी गर्दी नियंत्रणात आणली आणि मार्ग मोकळा केला, अशी माहिती समोर आली आहे.
सखोल चौकशी सुरू
तथापि, गेट ऑपरेशन्स, सिग्नलिंग सिस्टीम आणि ट्रक चालकाच्या निष्काळजीपणाची चौकशी रेल्वे प्रशासनाने सुरु केली असून सर्व तपासणी केल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.