बंगळुरू : कर्नाटकातील जामखंडी शहरातील रामतीर्थ मंदिरात इस्लामचा प्रचार करत पत्रके वाटणाऱ्या ३ मुसलमानांच्या विरोधात प्रविष्ट (दाखल) करण्यात आलेला गुन्हा कर्नाटक उच्च न्यायालयाने रद्द केला. मंदिराजवळ पत्रके वाटून इस्लामचा प्रचार केल्याचा आरोप असलेल्या तीन जणांविरुद्ध दाखल केलेला गुन्हा कर्नाटक हायकोर्टाने रद्दबातल ठरवला. मुस्लिमांनी मंदिरात इस्लामचा प्रचार करण्यासाठी पत्रके वाटणे, अल्लाहची स्तुती करणे आणि त्यांच्या धर्माबद्दल बोलणे, पत्रके वाटणे हा गुन्हा नाही, असे निरीक्षण कर्नाटक हायकोर्टाने नोंदवले.
जुन्या मंदिरात इस्लामचा प्रचार केल्याबद्दल या मुस्लिमांना अटक करण्यात आली होती. राज्याच्या धर्मांतरविरोधी कायद्यांतर्गत तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, धर्मांतराचा पुरावा नसल्यास मंदिरात इस्लामचा प्रचार करणारे पत्रके वाटणे आणि त्याचे स्पष्टीकरण देणे हा गुन्हा ठरत नाही. कर्नाटक हायकोर्टाचे न्यायमूर्ती व्यंकटेश नाईक यांनी मंदिराच्या आत पत्रके वाटणाऱ्या मुस्लिमांना जामीन मंजूर केला. या प्रकरणात धर्मांतराचे बळी ठरलेल्या किंवा त्याच्याशी संबंधित असलेल्यांनी कोणतीही तक्रार दाखल केलेली नसल्याचेही कोर्टाने म्हटले आहे.
आरोपींवर भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम २९९, ३५१(२) आणि ३(५) आणि कर्नाटक धर्म स्वातंत्र्य हक्क संरक्षण कायदा, २०२२ च्या कलम-५ अंतर्गत आरोप लावण्यात आला होता. सुनावणीदरम्यान, न्यायमूर्ती व्यंकटेश नाईक यांच्या खंडपीठाने सांगितले की, आरोपींनी संबंधित कायद्यांनुसार कोणताही गुन्हा केलेला नाही, कारण त्यांनी कोणत्याही व्यक्तीला इस्लाममध्ये धर्मांतरित करण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही.
तक्रारदाराने आरोप केला होता की, ४ मे २०२५ रोजी दुपारी ४:३० वाजता जामखंडी येथील रामतीर्थ मंदिरात काही लोक इस्लामिक शिकवणींचा प्रचार करणारे पत्रके वाटत होते आणि मंदिर परिसरात लोकांना त्यांच्या धार्मिक श्रद्धा तोंडी समजावून सांगत होते. घटनास्थळी उपस्थित असलेल्या हिंदू भाविकांनी त्यांच्या कृतींबद्दल विचारणा केली असता, मुस्लिम तरुणांनी हिंदू धर्मावर टीका करताना अपमानास्पद टिप्पणी केली, असेही तक्रारीत म्हटले आहे.