अहमदाबाद : बिहारमधील विधानसभेच्या निवडणुकीत एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी यांच्यात लढत होणार असल्याची अटकळ बांधली जात असतानाच ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल यांनी स्वबळाचा नारा देत आघाडीला जोरदार धक्का दिला आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी अरविंद केजरीवालांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्षाने रणशिंग फुंकले आहे. बिहारमध्ये आपने इंडिया आघाडीसोबत न जाता स्वबळाचा नारा दिला आहे. पक्षाचे राष्ट्रीय संयोजक केजरीवाल यांनी याबाबत घोषणा केली. केजरीवालांनी ‘एकला चलो’ अशी भूमिका घेतल्याने इंडिया आघाडीची डोकेदुखी वाढली आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीबद्दलची आम आदमी पक्षाची भूमिका केजरीवाल यांनी अहमदाबादमध्ये पत्रकार परिषदेत स्पष्ट केली. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि भाजपवर हल्ला चढवला. केजरीवाल म्हणाले, काँग्रेससोबत आमची कोणतीही आघाडी असणार नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी स्वबळावर मैदानात उतरेल.
जनतेचा संदेश
इंडिया आघाडी फक्त लोकसभा निवडणुकीसाठी होती. आता आमची कोणतीही आघाडी नाही. विधानसभा पोटनिवडणूक आम्ही काँग्रेससोबत न जाता लढवली आणि काँग्रेसपेक्षा तीनपट अधिक मते मिळवून विजयी झालो. आता आम आदमी पक्ष हाच पर्याय असल्याचा संदेश जनतेने दिला आहे, असे केजरीवाल म्हणाले.