Kerala : पिनराई विजयन यांच्या घरावर EDचे छापे 
राष्ट्रीय

Kerala : केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या घरावर EDचे छापे

केरळचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ सीपीआय(एम) नेते पिनराई विजयन यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांच्या मालमत्तांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवार सकाळपासून छापे टाकले.

Swapnil S

तिरुवनंतपुरम : केरळचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ सीपीआय(एम) नेते पिनराई विजयन यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांच्या मालमत्तांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवार सकाळपासून छापे टाकले. कोचीन मिनरल्स अँड रुटाईल लिमिटेड कंपनीशी संबंधित कोट्यवधी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास आता थेट माजी मुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत पोहोचल्याने केरळच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली.

कार्यकर्त्यांनी गाडी अडवली

ईडीचे पथक विजयन यांच्या घरातून तपास करून बाहेर पडत असताना वातावरण कमालीचे तापले. बेकरी जंक्शन येथील घराबाहेर मोठ्या संख्येने जमा झालेल्या सीपीआय(एम) आणि एसएफआय' च्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत ईडीच्या अधिकाऱ्यांची वाहने अडवण्याचा प्रयत्न केला. जमावाने अधिकाऱ्यांच्या गाडीवर दगडफेक आणि पाण्याच्या बाटल्या फेकल्या, ज्यामध्ये एका वाहनाची समोरील काच फुटली. या गाडीमध्ये महिला अधिकारीही उपस्थित होत्या. या जीवघेण्या हल्ल्याबाबत स्थानिक पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल करणार असल्याचे ईडी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या कडक सुरक्षेत ईडीच्या पथकांनी सकाळी ७ वाजता केरळ आणि बंगळुरूमधील एकूण १० ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकण्यास सुरुवात केली. यामध्ये तिरुवनंतपुरममधील बेकरी जंक्शन परिसरातील पिनराई विजयन यांचे भाड्याचे घर, त्यांचे जावई आणि माजी मंत्री पी. ए. मोहम्मद रियास यांचे कोझिकोडमधील निवासस्थान, तसेच विजयन यांचे कन्नूरमधील मूळ घर आणि 'सीएमआरएल' कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंधित ठिकाणांचा समावेश आहे. धाड पडली तेव्हा स्वतः माजी मुख्यमंत्री विजयन घरात हजर होते. या कारवाईदरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी काही महत्त्वपूर्ण गुंतवणुकीची आणि मुदत ठेवींची कागदपत्रे जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

काय आहे आर्थिक गैरव्यवहार

हा संपूर्ण तपास पिनराई विजयन यांची मुलगी वीणा विजयन आणि तिच्या मालकीच्या 'एक्सालॉजिक सोल्यूशन्स' या आयटी कंपनीभोवती केंद्रित आहे. 'सीएमआरएल' या खाजगी खनिज कंपनीने २०१५ ते २०२१ दरम्यान वीणा विजयन यांच्या कंपनीला आयटी आणि मार्केटिंग कन्सल्टन्सी सेवांच्या नावाखाली तब्बल १.७२ कोटी ते २.७८ कोटी रुपये दिले होते.

केंद्रीय तपास यंत्रणांनुसार, एक्सालॉजिक कंपनीने सीएमआरएलला कोणतीही आयटी सेवा पुरवलीच नव्हती. हे पैसे केवळ एका "बड्या नेत्याशी" (तत्कालीन मुख्यमंत्री पिनराई विजयन) असलेल्या जवळच्या संबंधांमुळे राजकीय प्रभावाचा वापर करून देण्यात आले होते, ज्याला ईडीने 'गुन्ह्याची कमाई' म्हटले आहे. याशिवाय, सीएमआरएलच्या व्यवस्थापकांनी वीणा विजयन यांच्या कंपनीला दिलेले ५० लाखांचे थकीत कर्ज बेकायदेशीरपणे वळवल्याचाही आरोप आहे. केरळ उच्च न्यायालयाने कालच (२६ मे) सीएमआरएल कंपनीची याचिका फेटाळून लावत ईडीच्या कारवाईला हिरवा कंदील दिला होता. त्यानंतर लगेचच ईडीने ही मोठी कारवाई केली.

राजकीय सूडाचा प्रयत्न - विजयन

तपास संपल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी हे छापे म्हणजे विरोधकांना संपवण्याचा केंद्र सरकारचा राजकीय कट असल्याचे म्हटले आहे. "हा केवळ एक सुडाचा प्रवास आणि सुरुवात आहे. अशा कारवायांनी आम्ही घाबरू किंवा कमकुवत होऊ, असा भ्रम कोणीही बाळगू नये," असा इशारा विजयन यांनी दिला. तसेच, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे नाव न घेता, "या छाप्यांमुळे कदाचित काही नेत्यांना मानसिक समाधान मिळाले असेल," असा टोलाही त्यांनी लगावला.

'कोर्टाची दिशाभूल केली, आता परिणाम भोगा'; समय रैनाला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, 'इंडियाज गॉट लेटेंट' प्रकरणी ३ लाखांचा दंड

शालेय अभ्यासक्रमात लैंगिक शिक्षणाचा समावेश; सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारची माहिती

Nashik : पर्यटक महिलेची छेड काढल्याचा जाब विचारताच कुटुंबावर हल्ला; पाठलाग करत कारची तोडफोड, VIDEO

Mumbai : कलाप्रेमींसाठी पर्वणी! पाहा 'काळा घोडा आर्ट अव्हेन्यू'ची खास झलक

Thane : 'अनधिकृत होर्डिंग्ज हटवा'; बॅनर दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश