राष्ट्रीय

पंतप्रधान मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्य; खर्गे यांना निवडणूक आयोगाची कडक नोटीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'दहशतवादी' असा उल्लेख केल्याची निवडणूक आयोगाने बुधवारी गंभीर दखल घेतली. आयोगाने काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खर्गे यांना 'कडक नोटीस' बजावली असून, या प्रकरणावर २४ तासांच्या आत स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तमिळनाडू आणि पश्चिम बंगालमधील मतदानाच्या अवघ्या एक दिवस आधी निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे.

Krantee V. Kale

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'दहशतवादी' असा उल्लेख केल्याची निवडणूक आयोगाने बुधवारी गंभीर दखल घेतली. आयोगाने काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खर्गे यांना 'कडक नोटीस' बजावली असून, या प्रकरणावर २४ तासांच्या आत स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तमिळनाडू आणि पश्चिम बंगालमधील मतदानाच्या अवघ्या एक दिवस आधी निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे. मंगळवारी चेन्नई येथे एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना खर्गे यांनी भाजप आणि अण्णा द्रमुक यांच्या युतीवर टीका केली होती. यावेळी बोलताना त्यांनी मोदींचा उल्लेख 'दहशतवादी' असा केला होता.

"पेरियार आणि सी. एन. अण्णादुराई यांच्या द्रविडी विचारधारेचा वारसा सांगणारे अण्णा द्रमुकचे नेते मोदींसोबत कसे जाऊ शकतात, मोदी एक दहशतवादी आहेत. त्यांचा समानतेवर विश्वास नाही आणि त्यांचा पक्षही न्याय आणि समानतेवर विश्वास ठेवत नाही, असे खर्गे म्हणाले होते.

खर्गेंचे स्पष्टीकरण

खर्गे यांच्या या विधानानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेत त्यांच्यावर जोरदार टीका केली. त्यानंतर पत्रकारांनी या विधानाबाबत विचारणा केली असता खर्गे यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास झाल्याचे सांगत स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, मी त्यांना शब्दशः दहशतवादी म्हटलेले नाही. पंतप्रधान सरकारी यंत्रणा आणि केंद्रीय संस्थांचा गैरवापर करून विरोधी पक्षांना आणि लोकशाहीला 'धमकवत' आहेत, असा माझ्या बोलण्याचा अर्थ होता. ते आपल्या सत्तेचा गैरवापर करून विरोधकांना बदनाम करण्याचे काम करत आहेत.

निवडणूक आयोगाने या विधानाला गांभीर्याने घेतले असून, आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवत खर्गे यांना नोटीस बजावली आहे. आता खर्गे यावर काय उत्तर देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Nagpur : जलशुद्धीकरण केंद्रात मध्यरात्री क्लोरीन वायूची गळती; ४० हून अधिक जण रुग्णालयात दाखल, VIDEO

'खेलो मुंबई' ॲपद्वारेच होणार नोंदणी; ॲडव्हान्स्ड स्मार्ट टर्फ धोरण लवकरच लागू; पालिका सभागृहाची मंजुरी

Ulhasnagar: घरे-दुकानांवरील 'रुंदीकरणाची टांगती तलवार' दूर होणार; ३६ ऐवजी २४ मीटरचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे

माथेरानमध्ये साथीच्या आजारांचा उद्रेक; दररोज ३० ते ४० रुग्णांवर उपचार; तातडीच्या उपाययोजनांची मागणी

कोळंबीसह ओल्या बोंबीलची आवक वाढली; मासळी बाजारात ग्राहकांची गर्दी; खवय्यांमध्ये उत्साहाचे वातावरण