कोची/नवी दिल्ली : कुवैतमधील अग्नितांडवात मृत्युमुखी पडलेल्या ४५ भारतीयांचे पार्थिव शुक्रवारी भारतात आणण्यात आले. कोची येथील विमानतळावर पार्थिव आल्यानंतर केंद्रीय मंत्री आणि केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांच्यासह राज्यातील मंत्र्यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली.
भारतीय हवाई दलाच्या विमानाने भारतीयांचे पार्थिव कोचीला आणण्यात आले. कोची येथे आणण्यात आलेल्या ३१ पार्थिवांपैकी २३ केरळचे, सात तामिळनाडूचे आणि एक कर्नाटकमधील आहे. दरम्यान, उर्वरित १४ जणांचे पार्थिव भारतीय हवाई दलाच्या त्याच विमानाने कोची येथून दिल्लीला रवाना करण्यात आले. विमान दिल्लीला आल्यानंतर नवनिर्वाचित खासदार योगेंद्र चंडोलिया आणि कमलजीत सेहरावत यांनी मृतांना आदरांजली वाहिली.
विमानतळावर मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश
भारतीय हवाई दलाचे विमान कुवैतहून आल्यानंतर पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यास जवळपास एक तासाचा अवधी लागला. इमिग्रेशन, कस्टम्स आणि विमानतळ आरोग्य कार्यालयातील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पार्थिव ठेवलेल्या पेट्या बाहेर आणण्यात आल्या. या पेट्या बाहेर आणताच बाहेर हजर असलेल्या नातेवाईकांचा बांध फुटला आणि जीवलगांचे पार्थिव स्वीकारण्याच्या कल्पनेनेच काही जणांनी अक्षरश: हंबरडा फोडला. हे दृश्य पाहून तेथील उपस्थितांचे डोळेही पाणावले. अधिकृत प्रक्रिया पार पडल्यानंतर पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
केरळच्या आरोग्य मंत्र्यांना केंद्राने परवानगी नाकारली
केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांना कुवैतमध्ये मदतकार्यासाठी पाठविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता, मात्र केंद्र सरकारने त्यासाठी परवानगी नाकारली. त्यावर राज्याचे मुख्यमंत्री पी. विजयन आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधकांनी जोरदार टीका केली, तर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आणि केंद्रीय मंत्री सुरेश गोपी यांनी केंद्राच्या निर्णयाचे समर्थन केले. कुवैतमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांचे पार्थिव शुक्रवारी भारतात आणण्यात येणार आहेत. असे असताना गुरुवारी जॉर्ज यांनी तेथे जाणे निरर्थक होते. तुम्ही काल कुवैतला गेल्या असतात आणि आज परत आल्या असतात, तर इतक्या अल्पावधीत तुम्ही कोणते काम करू शकला असतात. केंद्रीय मंत्री यापूर्वीच तेथे गेले आहेत आणि ते पार्थिव शुक्रवारी भारतात आणणार आहेत, असे खान यांनी म्हटले आहे.