लेह : लडाखचा सहाव्या अनुसूचित समावेश करावा आणि केंद्रशासित प्रदेशाऐवजी लडाखला राज्याचा दर्जा द्यावा या मागणीसाठी लडाखमधील नागरिकांनी ठिकठिकाणी आंदोलने सुरू केली असून या आंदोलनाला बुधवारी हिंसक वळण लागले. या हिंसाचाराच्या उद्रेकात चार जणांचा मृत्यू झाला असून ५९ जण जखमी झाले आहेत. दरम्यान, पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेले आपले उपोषण मागे घेतले आहे.
संतप्त जमावाची पोलिसांबरोबर झटापट झाली आणि जमावाने पोलिसांवर दगडफेकही केली. आंदोलकांनी लेह येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयावर दगडफेक करत कार्यालय पेटवून दिल्याने खळबळ माजली. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच काही ठिकाणी पोलिसांना आंदोलकांवर लाठीहल्ला करावा लागला. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली लडाखमध्ये विद्यार्थी आंदोलन करत आहेत. विद्यार्थ्यांचे शांततेच्या मार्गाने चाललेले आंदोलन बुधवारी हिंसक बनले. वागंचूक हे गेल्या १५ दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या या आंदोलनात चार प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा ही त्यापैकी पहिली मागणी आहे. तसेच लडाखचा संविधानाच्या सहाव्या अनुसूचित समावेश करावा, कारगिल व लेह या दोन जिल्ह्यांना लोकसभा मतदारसंघ घोषित करावे आणि लडाखमधील शासकीय नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना प्राधान्य मिळावे या मागण्यांसाठी लडाखमधील विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.
लडाखला राज्याच्या दर्जाची मागणी
‘कारगिल डेमोक्रेटिक फ्रंट’चे नेते सज्जाद कारगिल यांनी ‘एक्स’ या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, लेहमध्ये जे काही घडत आहे ते दुर्दैवी आहे. लडाख हा शांतताप्रिय प्रदेश आहे. मात्र, केंद्र सरकारने या भागाला केंद्रशासित प्रदेश बनवल्यामुळे येथील लोक हताश व असुरक्षित झाले आहेत. त्यामुळे सरकारची जबाबदारी आहे की त्यांनी आंदोलकांशी चर्चा करावी. त्यांनी लोकांच्या मागण्या मान्य कराव्यात व लडाखला राज्याचा दर्जा द्यावा आणि सहाव्या अनुसूचित समाविष्ट करावे.