कोरोनानंतर आलेल्या मंदीचा सर्वांवर परिणाम झाला आहे. २०२२ च्या पहिल्या सहामाहीत जगातील आघाडीच्या श्रीमंतांनी १.४ ट्रिलियन डॉलर गमावले आहेत. जागतिक अब्जाधीशवर्गासाठी ही आतापर्यंतची सर्वात मोठी सहामाही घट आहे. ब्लूमबर्गच्या म्हणण्यानुसार, मार्क झुकरबर्गची एकूण संपत्ती निम्म्याहून अधिक घसरली आहे.
ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकाच्या ताज्या अंदाजानुसार, २०२२च्या पहिल्या सहामाहीत जगातील ५०० सर्वात श्रीमंत लोकांनी या वर्षात आतापर्यंत ६ महिन्यांत १.४ ट्रिलियन (११० लाख कोटी) गमावले आहेत. यादरम्यान जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणजेच टेस्लाचे मालक इलॉन मस्क यांच्या संपत्तीत ४.७३ लाख कोटींनी घट झाली आहे. तर जेफ बेझोस यांचे ४.६८ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. कोरोनानंतरच्या कालावधीतील ही सर्वात मोठी घसरण आहे. तंत्रज्ञान कंपन्यांपासून क्रिप्टोकरन्सीतील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत घट झाली.
वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी धोरणकर्ते व्याजदर वाढवतात म्हणून काही उच्च-मूल्य समभाग आणि अब्जाधीशांना मोठ्या तोट्याचा सामना करावा लागत आहे.
ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या यादीनुसार टेस्लाचे सह-संस्थापक इलॉन मस्क यांच्याकडे अजूनही २०८.५ अब्ज डॉलरची सर्वोच्च निव्वळ संपत्ती आहे. जेफ बेझोस १२९.६ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह दुसऱ्या स्थानावर आहेत.