राष्ट्रीय

LOC वर पुन्हा तणाव : पाकिस्तानकडून कुरापती सुरूच; पाक लष्कराचा गोळीबार, भारतीय जवानांकडून चोख प्रत्युत्तर

काश्मीरमधील पहलगाममध्ये एप्रिल महिन्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सीमारेषेवर वातावरण तणावपूर्ण राहिलं आहे.

नेहा जाधव - तांबे

काश्मीरमधील पहलगाममध्ये एप्रिल महिन्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सीमारेषेवर वातावरण तणावपूर्ण राहिलं आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तब्बल २६ निरपराध पर्यटकांचा बळी गेला होता. त्यानंतर भारतीय वायूदलाने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकव्याप्त काश्मीर व पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. या कारवाईनंतर युद्धविरामाचा निर्णय दोन्ही देशांनी घेतला असला तरी प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर (LOC) पाकिस्तानकडून सुरू असलेल्या कुरापती थांबलेल्या नाहीत.

शनिवारी मध्यरात्री पाकिस्तानी सैनिकांनी नौगाम सेक्टरमध्ये भारतीय चौक्यांवर अचानक गोळीबार केला. सुरुवातीला छोट्या बंदुकांचा वापर करून चार फायर करण्यात आले. भारतीय जवानांनी कोणताही विलंब न लावता प्रत्युत्तर देत २० राउंड फायर केले. भारतीय कारवाईनंतर काही वेळातच पाकिस्तानी बाजूकडून गोळीबार थांबला. या चकमकीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, परंतु LOC वर पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

लष्करी सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकाराला शस्त्रसंधीचे उल्लंघन मानण्यात आलेले नाही. तरीदेखील हा प्रकार गंभीर मानला जात असून, पाकिस्तानकडून अशा घटना नेहमीच दहशतवाद्यांना भारतात शिरकाव करता यावा यासाठी घडवल्या जातात, असा आरोप करण्यात येत आहे.

भारतीय लष्कराकडून या घटनेवर अधिकृत निवेदन देण्यात आलेले नसले तरी, सूत्रांच्या माहितीनुसार जवान पूर्णपणे सतर्क असून शत्रुपक्षाच्या कोणत्याही हालचालींना जशास तसं उत्तर दिलं जाईल.

दरम्यान, याआधी सप्टेंबरच्या सुरुवातीला पुंछ जिल्ह्यात अशाच प्रकारे पाकिस्तानी गोळीबाराच्या आडून दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न झाला होता. तेव्हा भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर देत घुसखोरीची योजना उधळून लावली होती.

एलओसीवर पाकिस्तानकडून होणाऱ्या या सततच्या कुरापतींमुळे सीमाभागात राहणाऱ्या नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण आहे. तरी भारतीय लष्कराने खात्री दिली आहे की देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी जवान सदैव सज्ज आहेत.

मराठवाड्यात कोसळधार! ढगफुटी सदृश्य पावसाने गावांचा संपर्क तुटला, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

आता नोकरी मिळवणे होणार सोपे! केंद्र सरकार तयार करतेय ‘डॅशबोर्ड’

मतदार यादी सखोल परीक्षणासाठी सज्ज व्हावे; केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्देश

नवीन GST सुधारणांमुळे ग्राहकांना दिलासा; आजपासून अन्न, गृहनिर्माण, इलेक्ट्रॉनिक्स, औषधे, वाहने, शेती, आरोग्यसेवा स्वस्त

Mumbai : महालक्ष्मी मंदिरात ७७ CCTV ची नजर; नवरात्रोत्सवासाठी महालक्ष्मी मंदिराची सज्जता