शिमला : शिमल्याच्या संजौली परिसरातील मशिदीमधील अनधिकृत भाग तोडून टाकावा अशी मागणी बुधवारी निदर्शकांनी केली आणि सुरक्षा कडे भेदण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सुरक्षा दलांनी निदर्शकांवर लाठीमार केला.
जय श्रीराम, हिंदू एकता झिंदाबाद अशा घोषणा देत शेकडो निदर्शक सब्जी मंडी धल्ली येथे एकत्र आले आणि त्यांनी संजौलीच्या दिशेने कूच केले. निदर्शकांनी प्रतिबंधात्मक आदेश झुगारले आणि प्रशासनाने दिलेला इशाराही धुडकावला. त्याचप्रमाणे धल्ली बोगद्याजवळ सुरक्षा दलांनी उभारलेले कडेही निदर्शकांनी तोडण्याचा प्रयत्न केला.
काही हिंदू गटांनी केलेल्या आवाहनानुसार निदर्शक संजौली येथे आले आणि आणि मशिदीजवळ उभारण्यात आलेले दुसरे संरक्षक कडे त्यांनी तोडले. तेव्हा त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार करून पाण्याचा माराही केला. पोलिसांनी काही निदर्शकांना ताब्यात घेतले असून मशिदीजवळ पुन्हा संरक्षक कडे उभारले. मात्र निदर्शकांनी तेथून दूर होण्यास नकार दिला आणि प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजी केली. निदर्शकांमध्ये काही महिलाही होत्या, त्यांनी धल्ली येथे संरक्षक कडे तोडण्यापूर्वी हनुमान चालिसाचे पठणही केले. गेल्या १४ वर्षांपासून हे प्रकरण प्रलंबित असून पुढील सुनावणी ५ ऑक्टोबर रोजी होणार आहे. सुनावणी पूर्ण होईपर्यंत बांधकाम सील करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.