नवी दिल्ली : महाराष्ट्रातील लोकांकडे भाजपने दुर्लक्ष केले असून घोडेबाजार आणि आर्थिक तडजोडी भाजपने केल्याने हे सारे झाले आहे. यामुळे भाजप स्वतःच्या मूळ भूमिकेपासूनही दूर फेकला गेला आहे, असा आरोप करीत काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रातील रामटेक येथील रॅलीपूर्वी भाजपवर हल्लाबोल केला.
महाविकास आघाडीचे सरकार कोसळविण्यासाठी किती देणगी घेतली असा सवालही त्यांनी यावेळी केला. राज्याला दुष्परिणाम भोगावे लागले असून त्या महत्त्वाच्या मुद्द्यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. एक्सवर केलेल्या पोस्टमधून त्यांनी महाराष्ट्रातील भाजपच्या कारभारावर चांगलेच कोरडे ओढले.
ते म्हणाले की, गेल्या वर्षी शेकडो शेतकरी आत्महत्यांनी महाराष्ट्र हादरलेले असून तेथे भ्रष्टाचाराचे आरोपही सतत होत आहेत. मात्र आपल्या घोडेबाजार व आर्थिक तडजोडींमुळे विचलीत झालेल्या भाजपने याकडे दुर्लक्ष केले आहे.
महाराष्ट्र आणि भारतातील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्याची भाजपची दृष्टी तरी काय आहे, असाही सवाल रमेश यांनी केला. मुंबईतील आरोग्य सेवा सहसंचालक (खरेदी कक्ष) यांनी राज्याच्या रुग्णवाहिका सेवेसाठी ‘संशयास्पद’ निविदा काढली, त्याबद्दलही त्यांनी सवाल उपस्थित केले.
दिवसाला सात शेतकऱ्यांचे मृत्यू
महाराष्ट्रात सरासरी दिवसाला सात शेतकरी आपला जीव घेतात आणि ही हृदयद्रावक आकडेवारी राज्याच्या मदत आणि पुनर्वसन मंत्रालयाकडून मिळालेली आहे. त्यांच्या माहितीनुसार जानेवारी दरम्यान २३६६ शेतकऱ्यांचा मृत्यू आत्महत्येमुळे झाल्याची नोंद केली आहे.
दुष्काळी स्थितीबद्दलही ताशेरे
दुष्काळी परिस्थिती, त्यात पिकांचे झालेले नुकसान, सरकारकडून मदत न मिळणे, कर्जमाफी मदतवाढ, सॉफ्टवेअरमधील त्रुटीमुळे साडेसहा लाख शेतकी कर्जमाफीपासून वंचित राहाणे अशा विविध बाबींकडे जयराम रमेश यांनी महाराष्ट्रातील भाजपच्या नाकर्तेपणावर ताशेरे ओढले आहेत.