कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी रविवारी लोकसभेची निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय जाहीर करून राज्यातील सर्वच्या सर्व म्हणजे ४२ जागांवरील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. उमेदवारांची यादी जाहीर करताना ममता यांनी धक्कातंत्राचा वापर करीत विद्यमान सात खासदारांना डच्चू दिला असून माजी क्रिकेटपटू युसुफ पठाण आणि कीर्ती आझाद यांच्यासह अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.
‘कॅश फॉर क्वेरी’प्रकरणी लोकसभेतून हकालपट्टी करण्यात आलेल्या महुआ मोईत्रा यांना कृष्णानगर मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे २०२२ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत विजयी झालेले अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनाही असनसोल मतदारसंघातून पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर वादग्रस्त संदेशखळी भाग ज्या मतदारसंघात येतो त्या बसीरहाट मतदारसंघातून नुसरत जहाँ यांच्याऐवजी माजी खासदार हाजी नुरूल इस्लाम यांना उमेदवारी दिली आहे.
राज्यातील एकूण २३ खासदारांपैकी १६ जणांना पुन्हा संधी देण्यात आली आहे तर विद्यमान सात खासदारांचा पत्ता कापण्यात आला आहे. भाजपमधून दोन वर्षांपूर्वी तृणमूल पक्षात आलेल्या अर्जुन सिंह यांना बराकपूरमधून उमेदवारी नाकारण्यात आली आहे. यादीत एकूण १२ महिला उमेदवारांचा समावेश आहे. राज्यातील दोन मंत्र्यांसह नऊ विद्यमान आमदारांना लोकसभेच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे.
कोलकाता येथील ब्रिगेड परेड मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या सभेत ममता म्हणाल्या की, काही जणांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे, ज्यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत सामावून घेतले जाईल.
माजी क्रिकेटपटू युसुफ पठाण यांना बहरामपूर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि सलग पाच वेळा निवडून आलेले विद्यमान खासदार अधिर रंजन चौधरी यांचा हा बालेकिल्ला आहे. तर माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांना वर्धमान-दुर्गापूर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
कॉंग्रेस वास्तवापासून दूर - मुकुल संगमा
जयराम रमेश यांना तृणमूलचे नेते मुकुल संगमा यांनी प्रत्युत्तर देताना सांगितले की, आम्ही बराच काळ वाट पाहिली, परंतु इंडिया आघाडीतील ज्येष्ठ घटकपक्ष असलेला कॉंग्रेस वास्तवापासून दूर असल्याचे आम्हाला जाणवले. त्यामुळे आम्ही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला.
ही खेदाची बाब - जयराम रमेश
तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) काँग्रेससोबत जागावाटपाची चर्चा न करता लोकसभा निवडणुकीसाठी पश्चिम बंगालमधील उमेदवारांची यादी जाहीर केल्याबद्दल काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, आमच्या पक्षाला जागावाटपाचा फॉर्म्युला हवा होता पण तो सन्मानाचा असायला हवा होता. आम्ही जागावाटपाच्या फॉर्म्युलापर्यंत पोहोचू शकलो नाही ही खेदाची बाब आहे. असा कोणताही फॉर्म्युला एकतर्फी असू शकत नाही, परंतु प्रामाणिकपणे आणि मोठ्या मनाने त्याबाबत निर्णय व्हायला हवा होता, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
४२ उमेदवारांची यादी जाहीर
-माजी क्रिकेटपटू युसुफ पठाण, कीर्ती आझाद, शत्रुघ्न सिन्हा यांना उमेदवारी
-महुआ मोईत्रा यांना सलग दुसऱ्यांदा उमेदवारी
-नुसरत जहाँ, मिमी चक्रवर्तीसह
-विद्यमान सात खासदारांचा पत्ता कट
-संदेशखळीतून माजी खासदार पुन्हा रिंगणात