Lucknow Fire : लग्नाचं स्वप्न झालं भस्मसात! जिथे प्रेम फुललं, तिथेच जोडप्याचा अंत, लखनऊ अग्निकांडमधील मन सुन्न करणारी घटना  
राष्ट्रीय

Lucknow Fire : लग्नाचं स्वप्न झालं भस्मसात! जिथे प्रेम फुललं, तिथेच जोडप्याचा अंत, लखनऊ अग्निकांडमधील मन सुन्न करणारी घटना

लखनऊतील भीषण आगीत मृत्युमुखी पडलेल्या निलेश कुमार आणि अनामिका सामंत यांची हृदयद्रावक कहाणी समोर आली आहे. लग्नाची तयारी सुरू असतानाच त्यांचा त्याच ॲनिमेशन कोचिंग सेंटरमध्ये मृत्यू झाला, जिथे त्यांची ओळख झाली होती.

Mayuri Gawade

लखनऊच्या अलिगंज परिसरातील तीन मजली व्यावसायिक इमारतीला सोमवारी (दि. २२) दुपारी भीषण आग लागली. या दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला. मात्र, या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या निलेश कुमार आणि अनामिका सामंत यांची कहाणी अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारी आहे. काही महिन्यांत विवाहबंधनात अडकण्याची स्वप्नं पाहणाऱ्या या जोडप्याचा मृत्यू त्याच ॲनिमेशन कोचिंग सेंटरमध्ये लागलेल्या आगीत झाला, जिथे त्यांची पहिल्यांदा ओळख झाली होती आणि प्रेम फुललं होतं.

सोमवारी (दि. २२) दुपारी लखनऊच्या अलिगंज परिसरातील ॲनिमेशन कोचिंग सेंटर असलेल्या तीन मजली व्यावसायिक इमारतीला भीषण आग लागली. या दुर्घटनेत किमान १५ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. मृतांमध्ये निलेश कुमार आणि अनामिका सामंत यांचाही समावेश आहे.

मैत्रीचं प्रेमात रूपांतर

पीटीआयच्या वृत्तानुसार, २७ वर्षीय निलेश कुमार आणि ३० वर्षीय अनामिका सामंत हे दोघेही संबंधित ॲनिमेशन कोचिंग सेंटरमध्ये काम करत होते. कामाच्या ठिकाणी झालेली मैत्री हळूहळू प्रेमात बदलली. दोघांच्या नात्याला दोन्ही कुटुंबांचीही संमती मिळाली होती. गेल्याच आठवड्यात अनामिकाचे आई-वडील पश्चिम बंगालहून लखनऊमध्ये आले होते. दोन्ही कुटुंबांची भेट झाली आणि लग्नाची तयारीही सुरू झाली होती. घरात छोटेखानी कौटुंबिक समारंभही पार पडला होता. निलेशचा भाऊ अभिषेक याने सांगितले की, "आम्ही सर्वजण अनामिकाला भेटलो होतो. ती अतिशय आनंदी आणि मनमिळावू स्वभावाची होती."

नवीन घरातच करायचं होतं लग्न...

लग्नाच्या पुढील तयारीच्या दृष्टीकोनातून तयारी सुरू होती. निलेशच्या कुटुंबीयांनी पुढील आठवड्यात पश्चिम बंगालला जाण्यासाठी रेल्वेचं तिकिट आरक्षणही केलं होतं. निलेशच्या कुटुंबीयांच्या मते, गेल्या वर्षीच लग्न लावून द्यायचं होतं, पण निलेशला यंदा बढती आणि पगारवाढ मिळण्याची अपेक्षा होती. त्यामुळे आर्थिक स्थिती अधिक मजबूत झाल्यानंतर लग्न करायचे, अशी त्याची इच्छा होती. तो लग्नासाठी पैसे साठवत होता, चांगल्या भविष्यासाठी खूप मेहनत घेत होता. तसेच कुटुंबासाठी नवीन घर बांधण्याच्या कामातही त्याचा मोठा आर्थिक वाटा होता. "नवीन घर पूर्ण झाल्यानंतर त्याच घरात लग्न करायचं, असं निलेश आम्हाला नेहमी सांगायचा," असे त्याचे नातेवाईक समरेंद्र यांनी सांगितले.

अन् क्षणात सर्व संपलं

लग्नाच्या तयारीत गुंतलेल्या दोन्ही कुटुंबांना सोमवारी मोठा धक्का बसला. आग लागली तेव्हा निलेश आणि अनामिका दोघेही कोचिंग सेंटरमध्येच होते. आगीत अडकलेल्या अनेकांना बाहेर पडता आले नाही. जीव वाचवण्यासाठी काहींनी इमारतीतून उड्याही मारल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

दोन्ही कुटुंबांमध्ये असलेलं खेळीमेळीचं अन् लग्नाच्या तयारीचं वातावरण संध्याकाळपर्यंत शोकाकूल झालं होतं. लग्नाच्या तयारीत गुंतलेले नातलग अचानक रुग्णालये, पोलीस ठाणे आणि पोस्टमॉर्टम केंद्रांच्या फेऱ्या मारू लागले. मृतांच्या ओळखी पटवण्याची वेळ त्यांच्यावर आली. या दुर्घटनेत अनामिकाची २७ वर्षीय चुलत बहीण सोमिल्या हिचाही मृत्यू झाला. सोमिल्या देखील त्याच ॲनिमेशन सेंटरमध्ये कार्यरत होती. त्यामुळे एका दुर्घटनेत कुटुंबातील दोन सदस्य गमावल्याने तिच्या कुटुंबावर दुहेरी दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

ज्या प्रवासाचा शेवट विवाहमंडपात होणार होता, तो एका पोस्टमॉर्टम केंद्राच्या दारात येऊन थांबला. एका आगीने दोन कुटुंबांची स्वप्नं, दोन आयुष्यांची नवी सुरुवात आणि भविष्यासाठी रंगवलेली असंख्य स्वप्नं कायमची हिरावून घेतली.

Jharkhand Student Protest : भरती परीक्षांविरोधात आंदोलन; बॅरिकेड्स तोडून हजारो विद्यार्थ्यांचा विधानसभेवर मोर्चा, Video

किंमत तीच, वजन कमी! कच्च्या मालाच्या किमतीतील वाढीमुळे कंपन्यांपुढे पर्याय

पतीचा शोध घेत फ्लॅटवर पोहोचली, दुसऱ्या महिलेसोबत पाहताच राडा; दोघींची तुफान हाणामारी, VIDEO

कोल्हापूरची हद्दवाढ गरजेची; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

धावत्या ट्रेनमधून मोबाईल हिसकावला अन् प्रवाशाचा तोल गेला; CCTV मध्ये थरार कैद