गळ्यात साखळदंड, अंगावर चटके; पतीच्या जाचातून सुटण्यासाठी महिलेची ६ किमी पायपीट, थेट पोलीस ठाणं गाठलं 'एआय'ने बनविलेली प्रतिमा
राष्ट्रीय

गळ्यात साखळदंड, अंगावर चटके; पतीच्या जाचातून सुटण्यासाठी महिलेची ६ किमी पायपीट, थेट पोलीस ठाणं गाठलं

मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात पतीच्या अमानुष अत्याचारांना कंटाळलेल्या एका महिलेने गळ्यात साखळदंड अडकलेल्या अवस्थेत ६ किलोमीटर पायपीट करत थेट पोलीस ठाणे गाठले. मारहाण, कैद आणि अंगावर चटके दिल्याचा आरोप असलेल्या पतीला पोलिसांनी अटक केली असून या घटनेने संताप व्यक्त केला जात आहे.

Mayuri Gawade

मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातून अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. पतीच्या अत्याचारांना कंटाळलेल्या एका महिलेने गळ्यात साखळी अडकलेल्या अवस्थेत तब्बल ६ किलोमीटर पायी चालत पोलीस ठाणे गाठले आणि आपल्यावर झालेल्या अमानुष अत्याचारांची माहिती पोलिसांना दिली. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

पीडित महिलेचे नाव मांगीबाई तन्वर असे असून आरोपी पती सरदार सिंह तन्वर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दारूच्या नशेत सुरू झाला छळ

महिलेच्या तक्रारीनुसार, १० जून रोजी रात्री पती दारूच्या नशेत घरी आला. जेवणानंतर त्याने पत्नीशी वाद घालण्यास सुरुवात केली. वाद वाढल्यानंतर त्याने झाडाची फांदी तोडून तिला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे.

मारहाण सहन न झाल्याने मांगीबाई रात्रीच पोलिसांकडे जाण्यासाठी घराबाहेर पडली. मात्र वाटेतच पतीने तिला अडवले, पुन्हा मारहाण केली आणि जबरदस्तीने घरी आणले.

खांबाला बांधून ठेवले, अंगावर चटके दिले

घरी आणल्यानंतर आरोपीने महिलेच्या गळ्यात लोखंडी साखळदंड बांधला आणि तिचे दुसरे टोक घरातील खांबाला कुलूप लावून जखडून ठेवले. “आता पोलिसांकडे कशी जातेस ते बघतो,” अशी धमकीही दिल्याचा आरोप आहे.

यावरही तो थांबला नाही. पतीने लोखंडी सळई गॅसवर तापवून तिच्या कंबरेवर, मांडीवर आणि शरीराच्या इतर भागांवर चटके दिल्याचा गंभीर आरोप महिलेने केला आहे.

२४ तास कैद, पण संधीच्या प्रतीक्षेत

पुढील २४ तास मांगीबाई घरातच कैद होती. दरम्यान, पती गावात पंचायत बोलावून पत्नीवर पोलिसांत तक्रार न करण्यासाठी दबाव आणण्याची तयारी करत होता. पुढील अत्याचार टाळण्यासाठी मांगीबाईंनी वरवर त्याचे ऐकण्याचे नाटक केले, मात्र ती सुटकेची संधी शोधत होती. अखेर पती गावकऱ्यांना बोलवायला घराबाहेर पडताच तिला संधी मिळाली. घरात पडलेला एक दगड तिने उचलला आणि गळ्यातील कुलूपावर वारंवार प्रहार करण्यास सुरुवात केली.

अनेक प्रयत्नांनंतर कुलूप पूर्णपणे तुटले नाही, मात्र साखळदंडाची एक कडी सैल झाली. एवढीच संधी पुरेशी ठरली. गळ्यात साखळदंड आणि लटकणारे कुलूप तशाच अवस्थेत ठेवून तिने घरातून पळ काढला आणि थेट खिलचीपूर पोलीस ठाण्याचा रस्ता धरला.

६ किलोमीटर पायपीट करून पोहोचली पोलिसांकडे

रात्रीच्या अंधारात काटेकुट्यांतून चालत तिने सुमारे ६ किलोमीटरचा प्रवास केला. वाटेत अनेकांनी त्यांच्या गळ्यातील साखळदंड पाहून ती मानसिकदृष्ट्या आजारी असावी असे समजून तिच्याकडे दुर्लक्ष केले. मात्र ती न थांबता पोलिस ठाण्यात पोहोचली.

पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर तिने संपूर्ण घटना सांगितली. पोलिसांनी तातडीने तिची वैद्यकीय तपासणी केली. तपासणीत शरीरावर मारहाणीच्या आणि भाजल्याच्या खुणा आढळल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोपी अटकेत

महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गावात जाऊन आरोपी पतीला अटक केली. त्याच्याविरोधात मारहाण, बेकायदेशीर कैद आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

कोलंबियात ७.४ तीव्रतेचा भूकंप; १३२ जणांचा मृत्यू, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, Video

Mumbai : फेरीवाल्यांच्या ओळखपत्रासाठी पावणेदोन कोटींचा खर्च

१५ किलोमीटरसाठी दीड तास! कल्याण-बदलापूर महामार्गावर खड्डे, पाणी अन् कोंडी

वाशीत कौटुंबिक वादातून मुलानेच केली आईची हत्या; आरोपी अटकेत

ठाणेकरांवर करवाढीचे ओझे; प्रशासनाचा प्रस्ताव महासभेत सादर