रायपूर : महादेव ऑनलाइन बेटिंग ॲप घोटाळ्यातील सूत्रधार सौरभ चंद्राकर याच्याकडून न्यायाधीश आणि सरकारी अधिकाऱ्यांना मॅनेज करण्याचे आश्वासन देऊन १५ कोटी रुपयांहून अधिक रक्कम घेतल्याच्या आरोपावरून दिल्लीतील वकील हिमांशू शेखर यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. रायपूरमधील विशेष पीएमएलए न्यायालयाने सोमवारी रात्री शेखर यांना २८ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली.
मुंबईतील न्यायालयाने ट्रान्झिट रिमांड नाकारल्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर ईडीला शेखर यांना रायपूरमध्ये अटक करण्याचा मार्ग मोकळा झाला, अशी माहिती ईडीचे वकील सौरभ कुमार पांडे यांनी दिली. ईडीच्या कोठडीतील चौकशीदरम्यान चंद्राकर याने शेखर यांचे नाव घेतले होते. न्यायाधीश, वकील आणि सरकारी अधिकाऱ्यांना मॅनेज करण्याचे आश्वासन शेखर यांनी दिल्याचा आरोप चंद्राकरने केला. त्यासाठी १५ कोटी रुपये आणि त्यानंतर लहान रकमेच्या हप्त्यांमध्ये पैसे दिल्याचे त्याने तपास अधिकाऱ्यांना सांगितल्याचा दावा ईडीने केला आहे.
लूकआऊट सर्क्युलर
२० नोव्हेंबर रोजी दुबईला जाणाऱ्या विमानात बसण्याच्या तयारीत असताना मुंबई विमानतळावर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी शेखर यांना दुपारी तीनच्या सुमारास ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात ईडीने लूकआउट सर्क्युलर जारी केले होते. त्यानंतर ईडीच्या रायपूर पथकाने २१ नोव्हेंबरला पहाटे १.१० वाजता त्यांना ताब्यात घेतले आणि मुंबई न्यायालयात ट्रान्झिट रिमांडसाठी अर्ज केला. मात्र, न्यायालयाने अर्ज फेटाळला. शेखर यांच्या ताब्याची वेळ २० नोव्हेंबर रोजी दुपारी ३.०३ वाजल्यापासून ग्राह्य धरावी, असे मुंबई न्यायालयाने म्हटले होते. ईडीने या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आणि उच्च न्यायालयाने तो रद्द केला.
ओमानमधून प्रत्यार्पण
दरम्यान, शेखर यांच्या वकिलांनी ईडी कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज आणि प्रवेश नोंदवही जतन करण्याची मागणी केली आहे. चंद्राकर याला ओमानमधून प्रत्यार्पण करून भारतात आणण्यात आले असून तो रायपूर मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. महादेव बेटिंग ॲपच्या बेकायदा व्यवहारांतून ९२ हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेचा गुन्हेगारी पैसा निर्माण झाल्याचा ईडीचा आरोप आहे.