प्रयागराज : महाकुंभ मेळ्यात कडाक्याच्या थंडीची पर्वा न करता देशाच्या विविध भागातून भाविक पोहचत आहेत. परदेशी भाविकही मोठ्या प्रमाणावर कुंभमध्ये सामील झाले आहेत. मंगळवारी मकर संक्रांतीच्या दिवशी दिवसभरात ३.५ कोटी भाविकांनी प्रयागराज येथे जाऊन संगमावर शाही स्नानाचा योग साधला.
श्री पंचायती आखाडा महानिर्वाणीने पहिल्यांदा शाही स्नान केले. तसेच सर्वात शेवटीही श्री पंचायती आखाडाने शाही स्नान केले. प्रत्येक आखाड्याला स्नानासाठी ४०-४० मिनिटांचा वेळ दिला होता. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ३.५ कोटी जणांनी शाही स्नान केले.
प्रयागराज येथील महाकुंभमध्ये मंगळवारी ३.५० कोटी भाविकांनी श्रद्धेने डुबकी मारली. यावेळी १३ आखाड्यांच्या साधू-संतांनी शाही स्नान केले.
शाही स्नानानंतर महानिर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर चेतनगिरी म्हणाले की, प्रयागराजमध्ये दर १२ वर्षांनी पूर्ण कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते, तर १२ पूर्ण कुंभ झाल्यानंतर १४४ वर्षांनंतर महाकुंभ मेळा आयोजित केला जातो. महाकुंभात नदीच्या संगमावर डुबकी मारण्याची संधी भाग्यशाली माणसांना मिळते.
महाकुंभच्या पहिल्या शाही स्नानाच्यावेळी किन्नर आखाड्यानेही संगमावर डुबकी मारली. किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखाली किन्नर भाविकांनी संगमावर डुबकी मारली.
हेलिकॉप्टरद्वारे भाविकांवर फुलांचा वर्षाव
महाकुंभच्या शाही स्नानाच्यावेळी हेलिकॉप्टरद्वारे भाविकांवर २० क्विंटल फुलांचा वर्षाव करण्यात आला.
खूप चांगला, वेगळा अनुभव - परदेशी भाविक
अमेरिका, रशिया, जर्मनी, इटली, इक्वेडोरसहित जगाच्या विविध भागातून सनातन संस्कृतीचे स्वरूप पाहण्यासाठी भाविक आले आहेत. संगमावर डुबकी मारल्यानंतर त्यांनी ‘जय श्रीराम’ व ‘हर हर गंगे’चा उद्घोष केला. जर्मनीच्या क्रिस्तीनाने सांगितले की, डुबकी मारल्यानंतर असे वाटले की, आत्म्याला शांती मिळाली आहे.