Photo : ANI
राष्ट्रीय

ईडीविरोधात ममतांचा एल्गार; दोन एफआयआर दाखल; तृणमूलची दिल्लीत निदर्शने; ईडीची कोलकाता उच्च न्यायालयात धाव

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यात करण्यात आलेल्या ईडीच्या कारवाईविरोधात दंड थोपटले. दरम्यान, ईडीच्या कारवाईविरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून कोलकाता ते दिल्लीपर्यंत विविध ठिकाणी तृणमूलतर्फे आंदोलने करण्यात आली.

Swapnil S

कोलकाता : देशाच्या विविध राज्यांमध्ये असलेली विरोधी पक्षांची सरकारे अस्थिर करण्यासाठी केंद्र सरकार सक्तवसुली संचालनालयाचा (ईडी) गैरवापर करीत असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात असतानाच शुक्रवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यात करण्यात आलेल्या ईडीच्या कारवाईविरोधात दंड थोपटले. दरम्यान, ईडीच्या कारवाईविरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून कोलकाता ते दिल्लीपर्यंत विविध ठिकाणी तृणमूलतर्फे आंदोलने करण्यात आली.

आय-पॅकच्या संकुलांवर ईडीने केलेल्या छापेमारीचा उद्देश तृणमूल काँग्रेसच्या अंतर्गत रणनीतीची जबरदस्तीने चोरी करून ती ताब्यात घेण्याचा होता, असा आरोप ममता यांनी केला. ईडीने ज्या ठिकाणी छापेमारी केली तेथे स्वत: पोहोचून आपण कोणतेही गैरकृत्य केलेले नाही, असा दावाही ममता यांनी केला.

कोलकातामध्ये एका मोर्चाला संबोधताना ममता म्हणाल्या की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपच्या कोणत्या नेत्यांना कोळसा घोटाळ्यातून लाभ झाला त्याचे पुरावे आपल्याकडे असून गरज भासल्यास आपण ते जाहीर करू. कोळसा घोटाळ्यातील पैशांचा संबंध स्पष्ट करताना त्यांनी तृणमूल काँग्रेसचे माजी नेते सुवेन्दू अधिकारी आणि अमित शहा यांची नावे घेतली आणि त्याबाबतच्या पुराव्याचा पेन ड्राइव्ह आपल्याकडे असल्याचा इशाराही ममतांनी दिला.

पक्षप्रमुख म्हणून हस्तक्षेप केल्याचा दावा

जवळपास १० कि.मी. अंतर मोर्चाचे नेतृत्व केल्यानंतर मोर्चाला संबोधताना त्या म्हणाल्या की, ईडीच्या छापेमारीमध्ये आपण हस्तक्षेप केला ते मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर तृणमूल काँग्रेसच्या पक्षप्रमुख म्हणून केला. पक्षाच्या अध्यक्षा या नात्याने आपण तसे केले, आपण काहीही बेकायदेशीर केलेले नाही. आय-पॅकचे प्रमुख प्रतीक जैन यांच्या निवासस्थानी छापेमारी सुरू असताना ममता तेथे घुसल्या आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह ममता यांनी काही महत्त्वाचा पुरावा असलेला दस्ताोज आपल्यासोबत नेला, असा आरोप ईडीने केला. ईडीने सकाळी ६ वाजता छापेमारी केली, तर आपण दुपारी तेथे पोहोचलो, असे ममता म्हणाल्या. मात्र तोपर्यंत त्यांनी सर्वकाही चोरले होते. ईडी तपास करावयास आले होते, असे प्रथम आपला समज होता, मात्र ते पक्षाचे दस्ताोज आणि रणनीतीशी संबंधित कागदपत्रे चोरत असल्याची जाणीव झाली आणि आपण तेथे धाव घेतली, असेही मुख्यमंत्री म्हणाल्या. आय-पॅक ही तृणमूल काँग्रेसची राजकीय सल्लागार कंपनी आहे.

खासदारांची दिल्लीत निदर्शने

दरम्यान, ईडीच्या गैरवापराच्या निषेधार्थ दिल्लीत केंद्रीय गृहमंत्रालयाच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या अनेक खासदारांना ताब्यात घेण्यात आले. दिल्ली पोलिसांनी निदर्शने करणाऱ्या खासदारांना उचलून घटनास्थळावरून बाहेर हुसकावून लावले. गृहमंत्रालयाबाहेर निदर्शने करण्यास परवानगी नसल्याने खासदारांना ताब्यात घेण्यात आले आणि दुपारनंतर त्यांची सुटका करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले. हातात फलक घेऊन आणि घोषणाबाजी करणाऱ्या खासदारांमध्ये डेरेक ओ ब्रायन, शताब्दी रॉय, महुआ मोईत्रा, बापी हलदर, साकेत गोखले, प्रतिमा मोंडल, कीर्ती आझाद आणि शर्मिला सरकार यांचा समावेश होता.

ईडीविरोधात नोंदविले एफआयआर

दरम्यान, ममता यांनी शुक्रवारी ईडीविरोधात अनेक एफआयआर नोंदविले. तृणमूलची राजकीय सल्लागार कंपनी असलेल्या आय-पॅकवर टाकलेले छापे आणि त्या कंपनीच्या प्रमुखांच्या निवासस्थानांवर टाकलेला छापा या प्रकरणी ममतांनी एफआयआर नोंदविले आहेत. कोलकाता आणि विधाननगर पोलिसांनी एफआयआर नोंदविले असून तपास सुरू केला आहे.

ईडीची उच्च न्यायालयात धाव

ईडीच्या छापेमारीमध्ये अडथळे आणल्याच्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, या मागणीसाठी ईडीने कोलकाता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

Kerala : अखेर मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स संपला; व्ही. डी. सतीशन यांच्या नावावर शिक्कामोर्तब, काँग्रेसचा मोठा निर्णय

दागिने महागणार, तस्करी वाढण्याची भीती; सोन्यावरील आयात शुल्कात १५ टक्के वाढीचे परिणाम

... तर पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची शक्यता! RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचे संकेत

आपटा रेल्वे स्थानक बॉलिवूडचे ‘फेव्हरेट’ डेस्टिनेशन; सीएसएमटीनंतर सर्वाधिक पसंती; मध्य रेल्वेला ८५ लाखांचा महसूल

मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदारांवर होणार कारवाई; दीर्घकालीन उपाययोजनांसाठी समितीची स्थापना