राष्ट्रीय

अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्ण; दिल्लीतील मेट्रो स्थानकाचे नामांतर, आता 'श्री राम मंदिर मयूर विहार' अशी नवी ओळख

स्थानकाच्या नामांतरासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. तसेच, नव्या नावाला अधिकृत मान्यता देण्यात आली आहे.

किशोरी घायवट-उबाळे

नवी दिल्ली : पूर्व दिल्लीतील मयूर विहार पॉकेट-१ मेट्रो स्थानकाचं नाव अधिकृतपणे बदलण्यात आलं असून, आता हे स्थानक 'श्री राम मंदिर मयूर विहार' या नव्या नावाने ओळखलं जाणार आहे. शनिवारी (दि.७) अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली. स्थानिक रहिवासी आणि सामाजिक संघटनांकडून अनेक वर्षांपासून करण्यात येत असलेली ही मागणी अखेर पूर्ण झाली आहे.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, स्थानकाच्या नामांतरासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. तसेच, नव्या नावाला अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. पुढील काळात मेट्रो स्थानकावरील फलक, नकाशे आणि सरकारी कागदपत्रांमध्येही हे नवे नाव वापरण्यात येणार आहे.

राज्य नामकरण प्राधिकरणाची मंजुरी

पीटीआयच्या वृत्तानुसार, दिल्ली राज्य नामकरण प्राधिकरणाने (State Names Authority of Delhi) या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. ही २९ सदस्यीय समिती राजधानीतील रस्ते, उद्याने, वसाहती, चौक तसेच सार्वजनिक सुविधांच्या नामकरण व पुनर्नामकरणासंदर्भातील प्रस्तावांची छाननी करते. या समितीच्या अध्यक्षपदावर दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आहेत.

आमदारांकडून आनंद व्यक्त

त्रिलोकपुरीचे भाजप आमदार रविकांत यांनी या निर्णयाचं स्वागत केलं असून, मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. त्यांनी सांगितलं की, "ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती आणि मी गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने याबाबत पाठपुरावा करत होतो."

मंदिर जवळ असल्याने नामांतराची मागणी

आमदार रविकांत यांच्या मते, मेट्रो स्थानकाच्या जवळच श्रीराम मंदिर असून, स्थानिक रहिवाशांना स्थानकाचं नाव त्या धार्मिक व सांस्कृतिक ओळखीशी सुसंगत असावं, अशी भावना होती. याबाबत स्थानिक सनातन धर्म सभेच्या प्रतिनिधींनी त्यांच्याकडे औपचारिक मागणी केली होती, त्यानंतर सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यात आला.

या नामांतरामुळे स्थानिकांच्या भावनांना मान मिळाल्याची प्रतिक्रिया परिसरातून व्यक्त केली जात आहे.

Mumbai: चर्चगेटच्या आयकर भवनात भीषण आग; अडकलेल्या कर्मचाऱ्यांसाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न, VIDEO

पश्चिम बंगालमध्ये मोठी दुर्घटना! पहाटे गाढ झोपेत असतानाच हॉटेलला भीषण आग; ७ जणांचा करूण अंत, अनेकजण गंभीर, VIDEO

तारापूर MIDC मध्ये भीषण स्फोट; परिसरात धुराचे प्रचंड लोट, कारखान्याचे पत्रेही उडाले, Video

Bihar : श्रावणी सोमवारी मोठी दुर्घटना! अशोकधाम मंदिरात चेंगराचेंगरी; ७ महिला भाविकांचा मृत्यू, अनेक जखमी; VIDEO

महिलेचे फोटो काढले, जाब विचारला तर पिस्तूल रोखली; दिल्ली मेट्रोत गोंधळ, CISF जवान निलंबित