नवी दिल्ली: नागरिकांना ‘स्वदेशी’ उत्पादनांचा अभिमान बाळगण्याचे आवाहन केले. येत्या काही आठवड्यांत सणांचा हंगाम शिगेला पोहोचणार असल्याचे सांगत त्यांनी ‘वोकल फॉर लोकल’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ हाच विकसित भारताकडे जाण्याचा मार्ग असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केले.
‘मन की बात’ या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, जीवनात जे काही आवश्यक आहे ते स्वदेशी असावे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर 50 टक्के शुल्क लावल्यानंतर दोन्ही देशांतील संबंधांमध्ये आलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी पुन्हा एकदा आत्मनिर्भरतेवर भर दिला.
गणेशोत्सव साजरा होत असताना व आगामी नवरात्र, दुर्गापूजा व दिवाळीच्या काळात भेटवस्तू, कपडे, सजावटीच्या वस्तू किंवा इतर कोणत्याही खरेदीत ‘स्वदेशी’ उत्पादनांना प्राधान्य द्यावे, असे त्यांनी आवाहन केले.
मोदी म्हणाले, “अभिमानाने म्हणा हे स्वदेशी आहे, अभिमानाने म्हणा हे स्वदेशी आहे, अभिमानाने म्हणा हे स्वदेशी आहे. याच भावनेने पुढे जायचे आहे. एकच मंत्र आहे – वोकल फॉर लोकल; एकच मार्ग आहे – आत्मनिर्भर भारत; आणि एकच ध्येय आहे – विकसित भारत.”
मोदी यांनी रामायण व भारतीय संस्कृतीबद्दल जगभर वाढत असलेल्या आकर्षणाचा उल्लेख केला. याच महिन्यात कॅनडातील मिसिसॉगा येथे भगवान रामाची ५१ फूट उंचीची मूर्ती उभारण्यात आली, तर रशियातील व्लाडिवोस्टॉक येथे रामायणावर आधारित रशियन मुलांच्या चित्रांचे अनोखे प्रदर्शन झाले, असे त्यांनी सांगितले.