संग्रहित छायाचित्र  
राष्ट्रीय

'जननायक' पदवी चोरण्याचा प्रयत्न सुरू; बिहारच्या जनतेला सावधानतेचा इशारा देताना मोदींची राहुल, राजदवर टीका

भारतरत्न कर्पूरी ठाकूर यांची 'जननायक' ही पदवी चोरण्याचा प्रयत्न केला जात असल्याने बिहारच्या जनतेने सावध राहण्याची गरज आहे, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथून दिला.

Swapnil S

नवी दिल्ली : भारतरत्न कर्पूरी ठाकूर यांची 'जननायक' ही पदवी चोरण्याचा प्रयत्न केला जात असल्याने बिहारच्या जनतेने सावध राहण्याची गरज आहे, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथून दिला.

मतदार हक्क यात्रेदरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना काँग्रेसच्या नेत्यांनी 'जननायक' म्हटले होते. त्याचप्रमाणे पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांनी तेजस्वी यादव यांना जननायक म्हटले होते. काँग्रेसच्या द्विटर हँडलवर राहुल गांधी यांना जननायक म्हणत एक पोस्ट करण्यात आली होती, यावरुन मोदींनी राहुल गांधी आणि राजदवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान सेतू योजना आणि आयटीआय दीक्षांत समारंभात मोदी बोलत होते.

ज्या झाडाच्या मुळांना किडे लागले आहेत, त्याला पुन्हा जिवंत करणे हे एक पराक्रम आहे असे पंतप्रधान म्हणाले. राजदच्या कुशासनात बिहार त्या झाडासारखा झाला होता. सुदैवाने, बिहारच्या लोकांनी नितीशकुमार यांना संधी दिली आणि संपूर्ण एनडीए टीमने मिळून बिहारला पुन्हा रुळावर आणले असेही मोदी म्हणाले.

बुरखाधारी महिलांची ओळख पटवावी

दरम्यान, बिहार निवडणुकीत बुरखाधारी महिलांची ओळख पटवावी आणि विधानसभा निवडणूक एक किंवा दोन टप्प्यात घ्यावी, अशी विनंती भाजपने शनिवारी निवडणूक आयोगाकडे केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या नेतृत्वाखालील आयोगाचे पथक राज्याच्या दौऱ्यावर आले असताना त्यांची भेट घेऊन वरील विनंती त्यांना करण्यात आली. विविध मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी आयुक्तांची भेट घेतली.

सन्मान कोणी चोरू नये

कौशल्य दीक्षांत समारंभात बिहारला एक नवीन कौशल्य विद्यापीठ मिळाले आहे. नितीशकुमार यांच्या सरकारने या विद्यापीठाचे नाव भारतरत्न जननायक कर्पूरी ठाकूर यांच्या नावावर ठेवले आहे. मी बिहारच्या लोकांना सतर्क राहण्यास सांगू इच्छितो. जननायक ही पदवी कर्पूरी ठाकूर यांच्यासाठी योग्य आहे. बिहारच्या लोकांनी त्यांच्या कामगिरीची दखल घेत त्यांना हा सन्मान दिला. आजकाल काही लोकांनी जननायक ही पदवीही चोरायला सुरुवात केली आहे. म्हणून, मी बिहारच्या लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन करतो. आमच्या कर्पूरी ठाकूर साहेबांना लोकांनी दिलेला सन्मान कोणीही चोरू नये, असेही मोदी म्हणाले.

'शक्ती'चा तडाखा बसणार; ७ ऑक्टोबरपर्यंत किनारपट्टीला धडकणार चक्रीवादळ; मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्गला सतर्कतेचा इशारा

दार्जिलिंगमध्ये भीषण भूस्खलन; १४ जणांचा मृत्यू, दुडिया पूल कोसळला

चेंबूरमध्ये पोलिसांची धडक कारवाई; जुगार अड्ड्यावर छापा, ३३ जण ताब्यात

अंगणवाडी केंद्रे वाढणार; बालविवाह, हुंडा प्रथा रोखण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा १२ ऑक्टोबरला मशाल मोर्चा; प्रलंबित मागण्यांसाठी १३ ऑक्टोबरपासून बेमुदत ठिय्या आंदोलन