नवी दिल्ली : भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक असलेला यंदाचा मान्सून मंगळवारी संपल्याचे भारतीय हवामान खात्याने जाहीर केले. यंदा सरासरीपेक्षा ८ टक्के अधिक पाऊस झाला आहे.
भारतीय हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी सांगितले की, यंदाचा पावसाळा चांगला झाला. पण, यंदा ढगफुटी, भूस्खलन आदी आपत्तींचा सामना करावा लागला. देशात ८६८.६ मिमी सरासरी पाऊस पडतो. परंतु यंदा ९३७.२ मिमी पाऊस नोंदवला गेला. म्हणजेच ८ टक्क्यांची जादा नोंद झाली.
यंदाच्या पावसाळ्यात पूर्व व ईशान्य भारतात कमी पाऊस झाला. या भागात दरवर्षी १३६७.३ मिमी पाऊस पडतो. पण, यंदा १०८९.९ मिमी पाऊस झाला. म्हणजेच २० टक्के पाऊस कमी पडला. बिहार, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय या राज्यांत चारपैकी तीन महिने कमी पाऊस नोंदवला गेला. १९०१ नंतर पूर्व आणि ईशान्य भारतात कमी पाऊस झाला. यापूर्वी २०१३ रोजी सर्वात कमी पाऊस पडला होता. या प्रदेशात गेल्या काही वर्षांत सतत कमी पाऊस होत आहे. २०२० पासून हे प्रमाण कमी होताना दिसत आहे. गेल्या २० वर्षांच्या अभ्यासातूनही या भागात पावसात घट झाल्याचे स्पष्ट होते, असे मोहपात्रा म्हणाले.
उत्तर-पश्चिम भारतात ५८७.६ मिमीच्या सरासरीच्या तुलनेत ७४७.९ मिमी पाऊस झाला. म्हणजेच २७.३ टक्के जास्त. हा २००१ नंतरचा सर्वाधिक आणि १९०१ पासून सहाव्या क्रमांकाचा विक्रमी पाऊस आहे. जून, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये उत्तर-पश्चिम भारतातील सर्व जिल्ह्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला,” असे महापात्रा यांनी सांगितले.
मध्य भारतात ९७८ मिमीच्या सरासरीच्या तुलनेत ११२५.३ मिमी पाऊस झाला. म्हणजेच १५.१ टक्के अधिक पाऊस पडला. दक्षिणेकडील द्वीपकल्पात सरासरी ७१६.२ मिमीच्या तुलनेत ९.९ टक्के अधिक पाऊस नोंदवला गेला.