नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने भाताच्या किमान आधारभूत किमतीमध्ये (एमएसपी) प्रति क्विंटल ६९ रुपयांनी वाढ करण्यास मान्यता दिली आहे. ज्यामुळे २०२५-२६ च्या खरीप हंगामासाठी किमान आधारभूत किंमत २,३६९ रुपये झाली आहे.
याबरोबरच केंद्रीय मंत्रिमंडळाने आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी सुधारित व्याज अनुदान योजना देखील सुरू ठेवण्यास मंजूरी दिली आहे, ज्यामध्ये सध्या दिले जाणारे १.५ टक्के व्याज अनुदान सुरू ठेवण्यासाठी आवश्यक निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निर्णय मोदी यांच्या इकॉनॉमिक अफेअर्ससंबंधीत मंत्रिमंडळ समितीने (सीसीईए) घेतला आहे.
शेतकऱ्यांना व्याजदरावर सवलत
अश्विनी वैष्णव म्हणाले, शेतकऱ्यांसाठी व्याज सवलत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यासाठी १५,६४२ कोटी रुपये खर्च येईल. किसान क्रेडिट कार्डवर २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज ४ टक्के व्याजदराने
देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. देशात ७.७५ कोटींहून अधिक किसान क्रेडिट कार्ड खाती आहेत. याचा आता लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होईल.
एमएसपीला मंजुरी
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, शेतकर्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. खरीप पिकांसाठी गेल्या १०-११ वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात एमएसपी वाढवण्यात आली आहे. यातच भर टाकत, २०२५-२६ च्या खरीप बाजार हंगामासाठी मंत्रिमंडळाने एमएसपीला मंजूरी दिली आहे. एकूण रक्कम ही २,०७,००० कोटी रुपयांच्या जवळपास असेल. प्रत्येक पिकासाठी झालेला खर्च अधिक ५० टक्के विचारात घेण्यात आला आहे.
क्विण्टलमागील वाढ
जुलै-जून २०२५-२६ वर्षात आगामी खरीप हंगामासाठी सामान्य आणि अ दर्जाच्या वाणांसाठी आधारभूत किंमत अनुक्रमे प्रति क्विंटल ६९ रूपयांनी वाढवून २,३६९ रुपये आणि २,३८९ रुपये प्रति क्विंटल इतकी करण्यात आली आहे. डाळींसाठीच्या आधारभूत किंमतींमध्ये तूर डाळीसाठी ती ४५० रूपयांनी वाढवून ८,००० प्रति क्विंटल करण्यात आली आहे. खरीप हंगाम २०२५-२६ साठी उडीद डाळीची एमएसपी ४०० रूपयांनी वाढवून ७,८०० प्रति क्विंटल करण्यात आली आहे. मूग डाळीच्या एमएसपीत ८६ रूपयांची वाढ झाली आहे, ती ८७६८ प्रति क्विंटल करण्यात आली आहे.
मंत्रिमंडळाचे इतर निर्णय
याशिवाय, मध्य प्रदेशातील रतलाम ते नागदा दरम्यानचा रेल्वे मार्ग ४ लेन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याची लांबी ४१ किलोमीटर असेल. तसेच, महाराष्ट्रातील वर्धा रेल्वे मार्ग आणि तेलंगणामधील बल्लारशाह रेल्वे मार्ग ४ लेन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने बडवेल-गोपावरम गाव (एनएच-६७) ते आंध्र प्रदेशातील गुरुविंदपुडी (एनएच-१६) पर्यंतचा ४-लेन बडवेल-नेल्लोर महामार्ग बांधण्यास मान्यता देण्यात आली आहे. या महामार्गाची लांबी १०८.१३४ किलोमीटर एवढी आहे, त्यासाठी ३६५३.१० कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे.