NCERT च्या नव्या पाठ्यपुस्तकातील 'डान्सिंग गर्ल'वरून वाद; मोहेंजोदडोची मूळ प्रतिमा बदलल्याची चर्चा (Photo-X)
राष्ट्रीय

NCERT च्या नव्या पाठ्यपुस्तकातील 'डान्सिंग गर्ल'वरून वाद; मोहेंजोदडोची मूळ प्रतिमा बदलल्याची चर्चा

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (NCF) अंतर्गत इयत्ता १ ली ते १० वीसाठी सुरू करण्यात आलेल्या NCERT च्या हिस्ट्री ऑफ आर्टस् या पाठ्यपुस्तकात ही प्रतिमा प्रकाशित करण्यात आली आहे.

किशोरी घायवट-उबाळे

सिंधू संस्कृतीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या मोहेंजोदडो येथील ४,५०० वर्षे जुन्या 'डान्सिंग गर्ल' शिल्पावरून नवा वाद निर्माण झाला आहे. NCERT च्या इयत्ता नववीच्या नव्या पाठ्यपुस्तकात या शिल्पाची प्रतिमा मूळ स्वरूपापेक्षा वेगळ्या पद्धतीने सादर करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. प्रतिमेतील रंगछटा आणि आकृतीच्या सादरीकरणात बदल झाल्याचे म्हटले जात असून यावरून शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात प्रश्न उपस्थित केले जात आहेत

पाठ्यपुस्तकातील प्रतिमेवर आक्षेप

सिंधू संस्कृतीतील सर्वात प्रसिद्ध प्राचीन वस्तूंमधील एक असलेल्या 'डान्सिंग गर्ल' शिल्पाची प्रतिमा नव्या पाठ्यपुस्तकात काळ्या रंगात दाखवण्यात आली आहे. तसेच या शिल्पाच्या अंगावर कपडे दाखवण्यात आले आहेत.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (NCF) अंतर्गत इयत्ता १ ली ते १० वीसाठी सुरू करण्यात आलेल्या NCERT च्या हिस्ट्री ऑफ आर्टस् या पाठ्यपुस्तकात ही प्रतिमा प्रकाशित करण्यात आली आहे.

मूळ शिल्पाची वैशिष्ट्ये

मोहेंजोदडो येथे सापडलेले मूळ कांस्य शिल्प केवळ १०.५ सेंटीमीटर उंच असून त्याच्या वास्तवदर्शी सादरीकरणासाठी ते विशेष ओळखले जाते. या शिल्पामध्ये स्त्री आकृतीला एका हातात अनेक बांगड्या आणि गळ्यात हार दाखवण्यात आला आहे. याशिवाय ती निर्वस्त्र स्वरूपात दर्शवण्यात आली आहे.

NCERT कडून पुनरावलोकन

NCERT मधील एका अधिकाऱ्याने सांगितले की, हे प्रकरण पाठ्यपुस्तक विकास पथकाकडे पुनरावलोकनासाठी पाठवण्यात आले आहे.

"या प्रकरणाची पाहणी सुरू आहे. यामागे कोणतेही विशिष्ट कारण नाही. इयत्ता सहावीच्या समाजशास्त्राच्या पाठ्यपुस्तकात 'डान्सिंग गर्ल' शिल्प मूळ स्वरूपात इतर प्राचीन वस्तूंसह समाविष्ट करण्यात आले आहे," असे संबंधित अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

यापूर्वीही झाला होता वाद

मोहेंजोदडोच्या या प्रसिद्ध शिल्पाच्या सादरीकरणावरून यापूर्वीही वाद झाला होता. मे २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील प्रगती मैदान येथे आयोजित आंतरराष्ट्रीय संग्रहालय एक्स्पोचे उद्घाटन केले होते. त्यावेळी 'डान्सिंग गर्ल'च्या आधुनिक रूपांतरावर आधारित कार्यक्रमाच्या शुभंकराचे (Mascot)अनावरण करण्यात आले होते.

आयोजकांनी या शुभंकराचे वर्णन प्राचीन शिल्पाच्या आधुनिक रूपांतराच्या स्वरूपात केले होते. प्रदर्शनात येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करणाऱ्या "समकालीन द्वारपाल"चे प्रतीक म्हणून त्याची मांडणी करण्यात आली होती. मात्र, पाच फूटांहून अधिक उंचीच्या या रूपांतरावर अनेक इतिहासकार, पुरातत्त्वज्ञ आणि सोशल मीडिया युजर्सने आक्षेप घेतला होता. त्यांच्या मते, या शुभंकरामध्ये मूळ शिल्पाच्या स्वरूपात मोठे बदल करण्यात आले होते.

मूळ कांस्य शिल्प गडद रंगाचे असून दागिन्यांशिवाय निर्वस्त्र स्वरूपात आहे. मात्र, शुभंकरामध्ये गोरा वर्ण, वस्त्र आणि अलंकार दाखवण्यात आले होते.

२२ व्या वर्षी जगाचा निरोप; अभिनेत्री संचिता उगलेने राहत्या घरीच संपवलं जीवन, पोलीस तपास सुरू

अन्नभेसळ करणाऱ्यांना FDA चा दणका; वसई-विरारमध्ये १८ दुकाने सील, लाखोंचा भेसळयुक्त माल जप्त

गळ्यात साखळदंड, अंगावर चटके; पतीच्या जाचातून सुटण्यासाठी महिलेची ६ किमी पायपीट, थेट पोलीस ठाणं गाठलं

रीलमध्ये हसत-नाचत होती, पण... अभिनेत्री संचिता उगलेने उचललं टोकाचं पाऊल; शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत

दिल्लीकरांना दिलासा! नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून व्यावसायिक उड्डाणांना सुरुवात