सोशल मीडियावर मॅगीची चर्चा; अळ्या आढळल्याचा आरोप फेटाळत नेस्ले इंडियाचे स्पष्टीकरण, FSSAI कडून चौकशी सुरू 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
राष्ट्रीय

सोशल मीडियावर मॅगीची चर्चा; अळ्या आढळल्याचा आरोप फेटाळत नेस्ले इंडियाचे स्पष्टीकरण, FSSAI कडून चौकशी सुरू

कंपनीने गुणवत्ता नोंदी, बॅचची माहिती, बाजारातील नमुन्यांचे तपशील आणि प्रयोगशाळा अहवालांसह सविस्तर निवेदन FSSAI कडे सादर केले आहे.

किशोरी घायवट-उबाळे

मॅगी नूडल्समध्ये अळ्या आढळल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेस्ले इंडियाने याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कंपनीने हे आरोप फेटाळून लावत संबंधित बॅच तसेच बाजारातील नमुन्यांच्या तपासणीत उत्पादन सर्व गुणवत्ता आणि अन्नसुरक्षा निकषांवर खरे उतरल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाची भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) दखल घेत चौकशी सुरू केली आहे.

सोशल मीडियावरील तक्रारीनंतर कंपनीचे स्पष्टीकरण

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका युजरने मॅगीबाबत तक्रार केली होती. त्यानंतर FSSAI मार्फत कंपनीला या प्रकरणाची माहिती मिळाली. मात्र, तपासणीसाठी तक्रारदाराकडून कोणताही नमुना प्राप्त झालेला नाही. तसेच तक्रारदाराशी संपर्क साधण्याचे प्रयत्न करूनही संबंधित युजरकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नसल्याचे नेस्ले इंडियाने म्हटले आहे.

प्रयोगशाळा चाचणीत काय आढळले?

नेस्ले इंडियाच्या म्हणण्यानुसार, नियमित प्रक्रियेचा भाग म्हणून संबंधित बॅचचा संदर्भ नमुना FSSAI मान्यताप्राप्त आणि NABL प्रमाणित स्वतंत्र प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आला होता.

या तपासणीतील नमुन्यात कोणत्याही प्रकारचा अळ्यांचा प्रादुर्भाव आढळून आला नाही. तसेच बाजारातून घेतलेल्या नमुन्यांच्या चाचण्यांमध्येही उत्पादनाने सर्व गुणवत्ता आणि अन्नसुरक्षा निकषांचे पालन केल्याचे स्पष्ट झाल्याचे कंपनीने म्हटले आहे.

FSSAI कडे सविस्तर अहवाल सादर

कंपनीने गुणवत्ता नोंदी, बॅचची माहिती, बाजारातील नमुन्यांचे तपशील आणि प्रयोगशाळा अहवालांसह सविस्तर निवेदन FSSAI कडे सादर केले आहे. उत्पादन प्रक्रियेदरम्यान कठोर गुणवत्ता आणि अन्नसुरक्षा मानकांचे पालन केले जाते, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

FSSAI कडून अनेक कंपन्यांना नोटीस

अन्न सुरक्षा आणि गुणवत्तेबाबत वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत FSSAI ने नेस्ले इंडिया, KFC, फ्लिपकार्ट आणि 'ओपन सिक्रेट' या कंपन्यांना नोटिसा बजावून स्पष्टीकरण मागवले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ग्राहकांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर नियामक संस्थेने स्वतःहून या प्रकरणांची चौकशी सुरू केली आहे.

अळ्या, कीटक आणि अस्वच्छतेबाबत तक्रारी

तक्रारींमध्ये मॅगी नूडल्सच्या पाकिटात कीड आढळल्याचा दावा, फ्लिपकार्ट मिनिट्सद्वारे वितरित करण्यात आलेल्या खाद्यपदार्थात किडे सापडल्याची तक्रार आणि आंध्र प्रदेशातील एका KFC आउटलेटमध्ये अस्वच्छतेचे आरोप करण्यात आले होते. या सर्व प्रकरणांबाबत संबंधित कंपन्यांकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे.

शेअर बाजारात नेस्ले इंडियाला फटका

या घडामोडींचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून आला. शुक्रवारी नेस्ले इंडियाच्या शेअरमध्ये ३ टक्क्यांहून अधिक घसरण नोंदवण्यात आली. दरम्यान, FSSAI कडून या सर्व तक्रारींची सविस्तर चौकशी सुरू असून संबंधित कंपन्यांच्या स्पष्टीकरणाची प्रतीक्षा आहे.

Mumbai : वरळीत महागडा भाडेकरार; दरमहा २८.५ लाख रुपयांचे भाडे

Mumbai : एनटीसी गिरणी कामगारांचा आत्महत्या करण्याचा इशारा; कामगारांना पगार व पेन्शनची प्रतीक्षा

Mumbai : अतिक्रमणांवर महापालिकेचा हातोडा; साकीनाका, पवईत 'पादचारी प्रथम' अभियानांतर्गत एल विभागाची कारवाई

यंदा व्याजदर वाढ? वाढत्या महागाईमुळे रिझर्व्ह बँक पतधोरणात बदल करणार

ICC World Cup 2027 : खेळाडूंच्या दुखापती, व्यस्त वेळापत्रकामुळे सर्वोत्तम संघ निवडणे कठीण - गिल