मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगडावरील समाधी लोकमान्य टिळक यांनी शोधली होती, असे सूचक वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुण्यात सोमवारी केले होते. या वक्तव्यावरून नवीन वादंग निर्माण झाला आहे. विरोधकांनी या विधानाचा समाचार घेतला असून भागवत यांच्या वक्तव्याला विरोध केला आहे.
शिवाजी महाराज यांची रायगडावरील समाधी लोकमान्य टिळक यांनी शोधली होती, असे विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमात केले होते. त्यास राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध दर्शविला आहे.
रायगडावरील शिवाजी महाराजांची समाधी महात्मा फुले यांनी शोधली आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच शिवजयंती हा उत्सव महात्मा फुले यांनी सुरू केला, असेही त्यांनी स्पष्ट केले. भुजबळ यांच्या माहितीला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दुजोरा दिला. शिवाजी महाराजांची समाधी महात्मा फुले यांनी शोधल्याचे ऐतिहासिक पुरावे आहेत. लोकमान्य टिळकांनी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बांधली, असा वादग्रस्त दावा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २०२२ मध्ये केला होता. तेव्हा लोकमान्य टिळक यांचे पणतू रोहित टिळक यांनी शिवाजी महाराजांची समाधी महात्मा फुले यांनी शोधून काढल्याचे सांगितले. पण, या समाधीच्या नूतनीकरणाचे काम लोकमान्य टिळकांनी केले.