आशिष सिंग/मुंबई
प्रतिबंधित दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट (आयसिस) आणि अल् कायदाच्या विचारसरणीचा प्रसार करणाऱ्या एका मोठ्या ऑनलाईन नेटवर्कविरोधात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) बुधवारी महाराष्ट्रासह देशातील १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात एकूण २० ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले.
हे नेटवर्क देशातील तरुण वर्गाला हेरून त्यांचे ब्रेनवॉश करत होते. तसेच हिंसक जिहादचा प्रसार करून भारतात खिलाफत राजवट स्थापन करण्याच्या उद्देशाने देशविरोधी कारस्थान रचत होते, अशी माहिती तपास यंत्रणेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. या कारवाईत महाराष्ट्रात नवी मुंबईतील पनवेल, मुंबईतील ओशिवरा आणि पालघर जिल्ह्यातील विरार अशा तीन ठिकाणी छापे टाकण्यात आले. याव्यतिरिक्त आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, राजस्थान, गुजरात आणि दिल्ली येथेही एकाच वेळी ही शोधमोहीम राबवण्यात आली.
या प्रकरणाच्या तपासात पनवेलमधील आदर्श हाऊसिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या २१ वर्षीय शेख फैज उर रहमान याच्या घरावर एनआयएने छापा टाकला. विजयवाडा पोलिसांनी रहमानला यापूर्वी २२ मार्च रोजी विशाखापट्टणममधील गुन्ह्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांच्या मदतीने अटक केली होती. रहमान हा या आंतरराज्य नेटवर्कचा एक मुख्य दुवा असून त्याचे पुण्याचा शाहरूख खान आणि विजयवाडा मॉड्युलचा प्रमुख मोहम्मद रहमतुल्ला शरीफ यांच्याशी थेट संबंध असल्याचे तपासात समोर आले आहे. रहमान हा आयसिसशी संबंधित 'बेनेक्स कॉम' या ऑनलाईन समूहाच्या नावाखाली काम करत होता आणि परदेशातील हँडलर्सच्या सूचनेनुसार काम करत होता. त्याच्याकडून जप्त केलेल्या उपकरणांच्या विश्लेषणावरून ओशिवरा आणि विरार येथील संशयित व्यक्ती त्याच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट झाल्याने तिथेही छापे टाकण्यात आले.
या प्रकरणाची सुरुवात आंध्र प्रदेशच्या काउंटर इंटेलिजन्स सेलने इंटरनेटवरील संशयास्पद आयसिस उपक्रमांचा छडा लावल्यानंतर झाली.