सलग नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करून सीतारामन यांची इतिहासनिर्मिती; सर्वाधिक काळ सेवा देणाऱ्या अर्थमंत्र्यांमध्ये अव्वल 
राष्ट्रीय

सलग नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करून सीतारामन यांची इतिहासनिर्मिती; सर्वाधिक काळ सेवा देणाऱ्या अर्थमंत्र्यांमध्ये अव्वल

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी सलग नवव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करून इतिहास घडवला. आर्थिक वाढीची गती कायम राखणे, वित्तीय शिस्त पाळणे आणि अमेरिकेच्या टॅरिफसह जागतिक व्यापारातील तणावांपासून अर्थव्यवस्थेला संरक्षण देणाऱ्या सुधारणा जाहीर करण्याची अपेक्षा या अर्थसंकल्पातून व्यक्त करण्यात आली आहे.

Swapnil S

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी सलग नवव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करून इतिहास घडवला. आर्थिक वाढीची गती कायम राखणे, वित्तीय शिस्त पाळणे आणि अमेरिकेच्या टॅरिफसह जागतिक व्यापारातील तणावांपासून अर्थव्यवस्थेला संरक्षण देणाऱ्या सुधारणा जाहीर करण्याची अपेक्षा या अर्थसंकल्पातून व्यक्त करण्यात आली आहे.

या अर्थसंकल्पामुळे सीतारामन माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या १० अर्थसंकल्पांच्या विक्रमाच्या जवळ पोहोचल्या आहेत. देसाई यांनी वेगवेगळ्या कालखंडांत एकूण १० अर्थसंकल्प सादर केले होते. १९५९ ते १९६४ या काळात त्यांनी अर्थमंत्री म्हणून सहा अर्थसंकल्प, तर १९६७ ते १९६९ दरम्यान चार अर्थसंकल्प सादर केले होते.

माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि प्रणव मुखर्जी यांनी अनुक्रमे नऊ आणि आठ अर्थसंकल्प सादर केले होते; मात्र ते सलग नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सलग नऊ अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम मात्र सीतारामन यांच्या नावावर कायम राहणार आहे.

२०१९ मध्ये नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा निर्णायक विजय मिळवल्यानंतर सीतारामन यांची देशातील पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री म्हणून नियुक्ती झाली. २०२४ मध्ये मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतरही त्यांनी अर्थ मंत्रालयाची जबाबदारी कायम ठेवली.

३१ मे २०१९ रोजी अर्थ मंत्रालयाची सूत्रे स्वीकारलेल्या सीतारामन यांनी कोविड-१९ महामारी आणि भू-राजकीय अस्थिरतेच्या काळात देशाची अर्थव्यवस्था समर्थपणे हाताळली असून, भारताला जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था बनवण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. ३१ जानेवारी २०२६ रोजी त्यांनी पदावर सहा वर्षे आठ महिने पूर्ण केले असून, १ फेब्रुवारी रोजी सलग नववा अर्थसंकल्प सादर केला. हे भारताच्या संसदीय इतिहासातील अभिमानास्पद प्रकरण म्हणून नोंदले जाईल, असे म्हटले होते.

माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी एकूण १० वेळा, तर पी. चिदंबरम यांनी नऊ वेळा अर्थसंकल्प सादर केला असला तरी सलग वर्षांत नव्हता. सलग सर्वाधिक काळ अर्थमंत्री राहण्याचा विक्रम सी. डी. देशमुख यांच्या नावावर असून, त्यांनी १ जून १९५० पासून सुमारे सहा वर्षे दोन महिने ही जबाबदारी सांभाळली होती.

स्वतंत्र भारतातील अर्थसंकल्पाशी संबंधित काही महत्त्वाची तथ्ये

पहिला अर्थसंकल्प : स्वतंत्र भारताचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प २६ नोव्हेंबर १९४७ रोजी पहिले अर्थमंत्री आर. के. षण्मुखम चेट्टी यांनी सादर केला.

सर्वाधिक अर्थसंकल्प : माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि नंतर लालबहादूर शास्त्री यांच्या काळात अर्थमंत्री म्हणून एकूण १० अर्थसंकल्प सादर केले.

दुसऱ्या क्रमांकाचे अर्थसंकल्प : पी. चिदंबरम यांनी एकूण नऊ वेळा अर्थसंकल्प सादर केला. १९९६ मध्ये एच. डी. देवगौडा यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त मोर्चा सरकारमध्ये त्यांनी पहिला अर्थसंकल्प सादर केला. यूपीए सरकारच्या काळात त्यांनी २००४ ते २००८ दरम्यान पाच अर्थसंकल्प सादर केले. नंतर २०१३ आणि २०१४ मध्ये पुन्हा अर्थसंकल्प मांडला.

तिसऱ्या क्रमांकाचे अर्थसंकल्प : प्रणव मुखर्जी यांनी अर्थमंत्री म्हणून आठ अर्थसंकल्प सादर केले. १९८२, १९८३, १९८४ आणि २००९ ते २०१२ दरम्यान सलग पाच अर्थसंकल्प त्यांनी मांडले.

सर्वात लांब भाषण : १ फेब्रुवारी २०२० रोजी निर्मला सीतारामन यांचे दोन तास ४० मिनिटांचे अर्थसंकल्पीय भाषण हे आतापर्यंतचे सर्वात दीर्घ भाषण ठरले.

सर्वात छोटे भाषण : १९७७ मधील हिरुभाई मुळजीभाई पटेल यांचे अंतरिम अर्थसंकल्पीय भाषण केवळ ८०० शब्दांचे होते.

वेळ : पूर्वी अर्थसंकल्प सायंकाळी ५ वाजता सादर केला जात असे. १९९९ मध्ये तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी तो सकाळी ११ वाजता सादर करण्याची परंपरा सुरू केली. तेव्हापासून अर्थसंकल्प सकाळी ११ वाजता सादर केला जातो.

तारीख : २०१७ मध्ये अर्थसंकल्प सादर करण्याची तारीख २८ फेब्रुवारीऐवजी १ फेब्रुवारी करण्यात आली, जेणेकरून मार्चअखेर संसदीय प्रक्रिया पूर्ण करून १ एप्रिलपासून नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला अंमलबजावणी करता येईल.

आजचे राशिभविष्य, ९ मे २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Mother’s Day 2026 : 'ही' स्मार्ट उपकरणं तुमच्या आईसाठी ठरतील बेस्ट; घरकाम होईल सोपं, पाहा Photos

लहानपणीची आठवण ताजी करणारी चिंचेची कँडी; सोपी आणि झटपट रेसिपी

ब्लॅक मिनी ड्रेसमध्ये साराचा बोल्ड अंदाज; अंजली तेंडुलकरांनीही वेधलं लक्ष, पाहा Photos

World Thalassaemia Day 2026 : थॅलेसेमिया म्हणजे काय? जाणून घ्या लक्षणे आणि आयुर्वेदिक उपाय