पाटणा : बिहारमध्ये मोठ्या राजकीय बदलांचे संकेत मिळत असून मुख्यमंत्री नितीश कुमार हे १४ एप्रिल रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीनंतर आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. नितीश कुमार यांनी रविवारी मंत्रिमंडळ सचिवालयामार्फत या बैठकीची सूचना जारी केली आहे.
गेल्या आठवड्यात राज्यसभेवर निवडून गेलेले नितीश कुमार हे बैठकीनंतर आपला राजीनामा राज्यपाल सय्यद हसनैन यांच्याकडे सुपूर्द करतील, असे मानले जात आहे. त्यानंतर राज्यात भाजपच्या नेतृत्वाखालील नवीन सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा होणार आहे. 'जेडीयू'चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष संजय कुमार झा यांनी नवीन सरकार स्थापनेची प्रक्रिया १३ एप्रिलनंतर सुरू होईल, अशी माहिती दिली आहे.
राज्यातील सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर भाजपने केंद्रीय मंत्री आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची ‘केंद्रीय निरीक्षक’ म्हणून नियुक्ती केली आहे. भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड करण्यासाठी चौहान हे निरीक्षक म्हणून काम पाहतील, असे भाजपच्या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, ‘एनडीए’चा नवीन मुख्यमंत्री भाजपच्या शिफारशीनुसार निवडला जाईल.
सम्राट चौधरी यांचे नाव आघाडीवर
नव्या मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत सध्याचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे. चौधरी यांच्याकडे सध्या गृह खाते असून त्यांच्या निवडीमुळे नितीश कुमार यांनी गेल्या २० वर्षांत जोपासलेले ‘लव-कुश’ समीकरण ‘एनडीए’च्या बाजूने कायम राहण्यास मदत होऊ शकते, असे भाजपच्या गोटात मानले जात आहे. याशिवाय केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय, राज्यमंत्री लखेन्द्र पासवान आणि श्रेयसी सिंह यांची नावेही चर्चेत आहेत.
राज्यात भाजपचा पहिला मुख्यमंत्री?
भाजपचे केंद्रीय नेतृत्व कोणाची निवड करणार याबाबत अद्याप गुप्तता पाळली जात आहे. ‘पुढील मुख्यमंत्री कोण असेल याचा निर्णय आमचे केंद्रीय नेतृत्व घेईल आणि मी या शर्यतीत नाही’, असे माजी प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री दिलीप जयस्वाल यांनी स्पष्ट केले आहे. बिहारमध्ये प्रदीर्घ काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नितीश कुमार यांच्या युगाचा अंत होऊन भाजपचा पहिला मुख्यमंत्री राज्याला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नवीन नेत्याची अधिकृत घोषणा पुढील दोन दिवसांत होणे अपेक्षित आहे.