नवी दिल्ली : देशात तरुणांचे अचानक मृत्यू होण्यास कोरोनाची लस कारणीभूत नाही, असे स्पष्टीकरण बुधवारी राज्यसभेत केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी दिले आहेत.
कोरोनानंतर तरुणांच्या अचानक होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढली. या प्रकारानंतर कोरोना लशीमुळे तरुणांचे अचानक होणारे मृत्यू वाढल्याची सर्वत्र चर्चा होती. तसेच कोरोना लशीच्या दुष्परिणामांबाबतही उलटसुलट चर्चा होत होती. मात्र, कोरोनाची लस या मृत्यूंना कारणीभूत नसल्याचे नड्डा यांनी सांगितले.
राज्यसभेत नड्डा म्हणाले की, ‘आयसीएमआर’च्या अभ्यासात असे दिसून आले आहे की कोरोना लशीमुळे अचानक होणाऱ्या मृत्यूची शक्यता कमी होते. ‘आयसीएमआर’च्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमिओलॉजी’ने १८ ते ४५ वयोगटातील लोकांवर एक अभ्यास केला. यामध्ये अशा लोकांचा समावेश करण्यात आला, ज्यांचा १ ऑक्टोबर २०२१ ते ३१ मार्च २०२३ दरम्यान मृत्यू झाला होता.
या संशोधनासाठी देशातील १९ राज्यांतील ४७ रुग्णालयांमधून नमुने घेण्यात आले होते. यातील २९१६ नमुने हृदयविकाराच्या झटक्यानंतर वाचलेल्या लोकांचे होते, तर ७२९ नमुने अचानक मृत्यू झालेल्यांचे होते. या संशोधनानंतर असे सांगण्यात आले की, कोरोना लशीच्या किमान एक किंवा दोन मात्रा घेतल्यानंतर अचानक मृत्यूची शक्यता बऱ्याच प्रमाणात कमी होते.
कोरोना लस बनवणारी आघाडीची ब्रिटिश फार्मास्युटिकल कंपनी ‘एस्ट्राझेनका’ने त्यांनी निर्माण केलेल्या कोरोना लशीमुळे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात, असे मान्य केले होते. भारतात एस्ट्राझेनकाची ही लस ‘कोविशील्ड’ म्हणून वापरण्यात आली. या लशीमुळे रक्त गोठणे हा एक गंभीर दुष्परिणाम आहे, मात्र, असे प्रकार केवळ दुर्मिळ प्रकरणांमध्येच होतात, असेही कंपनीने म्हटले होते.