राष्ट्रीय

कुख्यात वाघ तस्कर कल्ला बावरियाला अटक

नवशक्ती Web Desk

भोपाळ : देशभरात वाघांच्या शिकारीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या मध्य प्रदेशातील बव्हेरिया टोळीचा म्होरक्या, कुख्यात आंतरराष्ट्रीय व्याघ्र तस्कर कल्ला बावरिया याला अटक करण्यात आली आहे. मध्य प्रदेशच्या स्टेट टायगर स्ट्राइकच्या पथकाला तो गेल्या अनेक दिवसांपासून गुंगारा देत होता.

२०१३ मध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्पात झालेल्या वाघांच्या शिकारीत कल्ला बावरियाचा सहभाग होता. तेव्हापासून तो फरार होता. सोबतच अनेक राज्यांत वाघांच्या तस्करीत त्याचा सहभाग होता. अटकेच्या भीतीने कल्ला बावरिया मध्य प्रदेशच्या विदिशा आणि सागर जिल्ह्यात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. कल्ला बावरियावर नेपाळमध्येही वाघाची शिकार आणि अवयवांची तस्करी केल्याचे गुन्हे नोंद आहेत. त्यामुळे अनेक राज्यांचे पोलीस, वन आणि व्याघ्र प्रकल्पाचे पथक त्याच्या मागावर होते. त्याच्या अटकेमुळे केवळ मध्य प्रदेशातच नव्हे तर देशात वाघांच्या शिकारीला आळा बसेल. कल्लाच्या अटकेनंतर बव्हेरिया टोळीतील इतर सदस्यांच्या शोधासाठी मध्य प्रदेश टायगर स्ट्राइक पथक देशातील इतर राज्यांतून माहिती गोळा करत आहे.

मध्य भारतात अलर्ट

देशात मध्य भारतात सर्वाधिक वाघ आहेत. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणासह महाराष्ट्रातील ताडोबासह पेंच, मेळघाट आणि गडचिरोली व्याघ्र प्रकल्प शिकाऱ्यांच्या रडारवर आहेत. काही दिवसांपूर्वी आसाममध्येही एका वाघाची कातडी जप्त करण्यात आली होती. ही कातडी मध्य भारतातील वाघाची असल्याचा संशय आहे. त्यामुळे मध्य भारतातील व्याघ्र प्रकल्पांना अलर्ट देण्यात आला आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस