नवी दिल्ली : सध्याच्या काळात ज्येष्ठ नागरिकांच्या पेन्शनचा प्रश्न गंभीर झाला आहे. अनेकांना पेन्शन पुरेशी मिळत नाही. त्यामुळे दैनंदिन खर्च भागवणे कठीण बनले आहे. आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आई-वडिल विमा पॉलिसी घेत असतात. आता केंद्र सरकारने आजच्या अर्थसंकल्पात आपल्या मुलांच्या पेन्शनसाठी ‘एनपीएस वात्सल्य’ ही योजना जाहीर केली आहे. या योजनेमुळे आपल्या मुलाबाळांचे भविष्य सुरक्षित राहण्यास मदत मिळणार आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी विविध क्षेत्रांच्या विकासासाठी योजनांची घोषणा केली. यावेळी त्यांनी ‘एनपीएस वात्सल्य’ ही योजनादेखील जाहीर केली. या योजनेद्वारे आता पालकांना त्यांच्या अल्पवयीन मुलांच्या शिक्षणाची तसेच वृद्धापळात त्यांच्या पेन्शनची सोय करता येणार आहे.
एनपीएस वात्सल्य ही योजना अल्पवयीन मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक बचत करण्याच्या उद्देशाने जाहीर करण्यात आली आहे. या योजनेनंतर्गत पालक त्यांच्या अल्पवयीन मुलांच्या नावाने बॅंक खात्यात पैस जमा करू शकतील. तसेच त्याद्वारे राष्ट्रीय पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकतील. महत्त्वाचे म्हणजे १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर हे खाते मुलांच्या नावे हस्तांतर करता येणार आहे. १८ ते ७० वर्ष वयोगटातील प्रत्येक भारतीय नागरीकाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे.